चिपी विमानतळ आता तब्बल २२ वर्षांनंतर पूर्ण झाले असून, उद्या या विमानतळाचे उद्घाटन आहे. याचमुळे गुरुवारी, ८ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याशी संवाद साधला. राज्यातील विविध विमानतळांच्या विकासाबाबत तसेच त्यातील अडचणी सोडविण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी चिपी विमानतळ सुरू झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यालाच नव्हे, तर कोकणाला मोठा फायदा होईल, असे सांगून सिंधिया यांना महाराष्ट्र भेटीचे निमंत्रण दिले.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी विशेषतः नांदेड, कोल्हापूर, औरंगाबाद येथील विमानतळांवर अधिक क्षमतेने हवाई वाहतूक सेवा सुरू व्हावी, जेणे करून पर्यटक व नियमित प्रवाशांची संख्या वाढेल व या भागांना त्याचा फायदा होईल यादृष्टीने चर्चा केली, तसेच काही तांत्रिक अडचणींचे निराकरण करण्याची विनंती केली. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ सुरू होत आहे, त्याचा निश्चितच जिल्ह्याला व राज्याला फायदा होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
(हेही वाचा : शिवसेनेची मैदानात धाव!)
चिपीवरून असा रंगला होता वाद
चिपी विमानतळाच्या उद्घाटनाआधीच शिवसेना व भाजपामध्ये श्रेयाची लढाई सुरू आहे. चिपी विमानतळासाठी शिवसेनेने संसदेत अनेकदा पाठपुरावा केल्याचे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे. तर, आमच्या पाठपुराव्यामुळे व केंद्र सरकारच्या प्रयत्नांतूनच हे विमानतळ सुरू होत असल्याचा भाजपाचा व नारायण राणे यांचा दावा आहे. विमानतळाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे असलेच पाहिजेत असे नाही. ते आले तर त्यांना प्रोटोकॉलनुसार मान देऊ, असे राणे यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. मात्र, भाजपने सबुरीची भूमिका घेत त्यावर पडदा टाकला होता. आता प्रत्यक्ष कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका तयार झाली आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव पहिल्या क्रमांकावर असून, त्यांच्याच हस्ते विमानतळाचे उद्घाटन होणार आहे.
Join Our WhatsApp Community