गेल्या दोन वर्षांपासून राज्यात कोरोना महामारीचा कहर सुरू होता. मात्र आता राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा नियंत्रणात येत असल्याने जनजीवन पुन्हा पूर्ववत होताना दिसतंय. साधारण दोन वर्षांनंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज बुधवारी मंत्रालयात होते. त्यामुळे तब्बल दोन वर्षांनी मंत्रालयाचा ६ वा मजला पुन्हा एकदा गजबजला असल्याची चर्चा सुरू आहे. कोरोना आणि कोरोनादरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार हे कारभार पाहत होते. परंतु आता मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात हजेरी लावल्याने निर्णय प्रक्रियेत वेग येईल, अशी शक्यता राजकीय कार्यकर्त्यांमध्ये वर्तविली जात आहे.
मंत्रालयात दाखल होताच विविध विभागाचा दौरा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील कोरोनादरम्यान प्रत्यक्ष मंत्रालयात न जाता वर्क फ्रॉम करत होते. मुख्यमंत्री मंत्रालयात जात नसल्याच्या मुद्द्यावर विरोधकांनी त्यांच्यावर चांगलाचा निशाणा साधला होता. कोरोना दरम्यान मुख्यमंत्री यांनी घरातून राज्याच्या कारभाराची सूत्रं सांभाळली होती तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर मंत्री मंत्रालयात हजर होते. परंतु आता पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनातील गर्दी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे वळताना दिसणार आहे. मंत्रालयात मुख्यमंत्री दाखल होताच त्यांनी विविध विभागाचा दौरा देखील केला.
आता सहाव्या मजल्यावरील कारभार सुरू होणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे गेली दोन वर्षे त्यांना मंत्रालयात जात आले नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी प्रवास करणंही अत्यंत कमी केले होते. त्यामुळे राज्याचे प्रशासकीय कामकाज गेली दोन वर्षे मंत्रालयाऐवजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवास्थान आणि सह्याद्री अथितीगृहातूनच हाकत होते. राज्य मंत्री मंडळाच्या मंत्रालयात झालेल्या बैठकांनाही मुख्यमंत्री व्हिडिओ काँनफर्सिंगद्वारे उपस्थित होते. माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार, प्रशासनाला कोणतीही कल्पना न देता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी अचानक मंत्रालयात दाखल झाले होते.
(हेही वाचा – २ वर्षांनी दुमदुमणार विठुनामाचा जयघोष! असा असणार आषाढी पायी वारीचा सोहळा)
अचानक दाखल झाल्यामुळे तळ मजल्यापासून सातव्या मजल्यापर्यंत प्रशासकीय कर्मचाऱ्यांची तारांबळ उडून धावा-धाव सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी मंत्रालयातील सुरक्षा रक्षकही सतर्क झालेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात दाखल झाल्यामुळे आता मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयातूनच राज्य सरकार आणि प्रशासनाचा कारभार सुरू होणार आहे. आज, मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात हजेरी लावल्याने त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे म्हटले जात आहे.