राज्यात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. सध्या राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या निकालासाठी मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत एका मतदारसंघातील निकाल हाती आला असून भाजप उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले आहेत. एकूण पाच मतदारसंघातील निकाल गुरुवारी जाहीर होणार आहेत. त्यामुळे सध्या राज्याचे लक्ष पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या निकालाकडे असताना पोटनिवणुकीसंदर्भात एक मोठी घडामोड समोर आली आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप भाजपकडून उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नुकताच त्यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे. पण अश्विनी जगताप याच भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत का? असा प्रश्न उपस्थितीत झाला आहे. तसेच येत्या काळात आणखीन कोणी उमेदवार भाजपकडून अर्ज घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे आहे.
कारण, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप देखील इच्छुक आहेत. अशातच लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी गुरुवारी, ग प्रभाग येथून उमेदवारी अर्ज विकत घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सध्या भाजपचा अधिकृत उमेदवार नक्की कोण? अशी चर्चा सुरू झाली आहे.
पुण्यातील कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी येत्या २६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तसेच निकाल २ मार्चलाच लागणार आहे.
(हेही वाचा – Maharashtra MLC Election Results: निकाल काही तासांवर असतानाच सत्यजित तांबेंना मोठा धक्का)
Join Our WhatsApp Community