मुंबई क्रूझ ड्रग्स पार्टी आणि आर्यन खान प्रकरणात अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिकांच्या आरोपांना समीर वानखेडे, यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर, त्यांचे वडील आणि बहीण यास्मिन यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले आहे. त्यानंतर आता भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही या आरोपांवरुन एका महिलेच्या कौटुंबिक आयुष्यावर भाष्य करण्याचा अधिकार नवाब भाईंना कोणी दिला?, असा सवाल उपस्थित करत, नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाल्या चित्रा वाघ?
महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिकजी खुलेआम एका महिलेच्या कौटुंबिक विषयाबाबत सर्व माध्यमांपुढे नाहक बदनामी करत आहेत. मौलाना खरं बोलतोय की सरकारी कागदपत्रे, याची शहानिशा न्यायालयीन प्रक्रियेतच होऊ शकते. पण एका स्त्रीच्या व्यक्तीगत आयुष्याचा माध्यमांपुढे सार्वजनिक बाजार मांडण्याचा अधिकार नवाब भाईंना कोणी दिला?, असा सवाल करत चित्रा वाघ यांनी नवाब मलिकांना जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.
(हेही वाचा : नागरिकांना बदनाम करण्यासाठी एनसीबीचा गैरवापर!)
राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सवाल
साध्या ट्विटवर गुन्हा दाखल करणारे मुख्यमंत्री आज उघडपणे एका महिलेची बदनामी होत असताना गप्प का आहेत?, असा प्रश्न उपस्थित करत चित्रा वाघ म्हणतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले की, ज्या कॉंग्रेसी प्रवृत्तीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा साम-दाम-दंड-भेद वापरून निवडणुकीत पराभव केला होता, ती कॉंग्रेसी प्रवृत्ती जेव्हा जेव्हा सत्तेवर येते तेव्हा तेव्हा दलित आणि शोषितांवर अन्यायच होतात.
Join Our WhatsApp Community