‘कोणत्याही चौकशीला तयार…’ ;चित्रा वाघ यांचे आव्हान

140

रघुनाथ कुचिक प्रकरणात बलात्कार पीडितेने केलेल्या गंभीर आरोपांनंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली आहे. फेब्रुवारीपासून एकट्या लढणाऱ्या पीडितेसोबत उभी राहिले तेव्हा कुणी तिच्या मदतीला नव्हतं. आज मात्र माझ्या विरोधात सगळे एकत्र आले याचा आनंद वाटला, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले असून या प्रकरणातील पीडित तरुणीने आता थेट भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आपल्याला गोव्यात तसेच मुंबईत चित्रा वाघ यांच्या मदतीने डांबून ठेवले. पोलिसांना विशिष्ट जबाब देण्यास वाघ यांनीच सांगितल्याचा गंभीर आरोप पीडित तरुणीने केला आहे. त्यामुळे या प्रकरणावरुन आता राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावर जोरदार टीका केली. म्हणूनच बलात्कार पीडितेने केलेल्या आरोपांची राज्य सरकारने जरूर चौकशी करावी, कोणत्याही चौकशीला आपण तयार आहोत असे आव्हान भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे.

( हेही वाचा : आधी सभा साहेबांची, मग लग्न घरातले! वसंत मोरे ठाण्यात पोहचले )

…म्हणून तरूणीसाठी लढण्याचे ठरवले

चित्रा वाघ यांनी यावेळी या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम उलगडून सांगितला. त्यांनी सांगितले की १६ फेब्रुवारी रोजी सदर तरुणीने मला दूरध्वनी केला. त्यावेळी मी राज्याबाहेर होते. राज्यात परतल्यानंतर २-३ दिवसांनी पुण्यात पीडित तरुणीची माझी भेट झाली. सदर तरुणीने मला तिच्यावर २०१७ पासून झालेल्या अत्याचारांची कथा सांगितली. त्या पीडितेने तिच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात झालेल्या उपचारांबाबतची माहितीही कागदपत्रांसह मला दिली. हे पुरावे पाहून मी त्या तरुणीसाठी लढण्याचे ठरवले. पुण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह राज्याच्या गृहमंत्र्यांनाही या तरुणीवरील अत्याचारांची माहिती कळवली. ती तरुणी एकटी लढते आहे आपण तिला साथ दिली पाहिजे या भावनेने मी तिच्यासाठी लढण्याचे ठरवले. हे करताना एका महिलेला न्याय देण्याची माझी भूमिका होती. ही माझी चूक असेल तर ती मला कबूल आहे. असे वाघ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पीडितेला न्याय मिळावा अशीच भावना

सदर तरुणीने कोणकोणते संदेश मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला पाठवले याची माहितीही चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्या म्हणाल्या की, आता पीडितेने कोणत्या हेतूने माझ्यावर आरोप केले आहेत हे मला ठाऊक नाही. ज्यावेळी ही तरुणी न्याय मागत होती त्यावेळी तिच्या मदतीस कोणीही आले नाही. आता तिने माझ्यावर आरोप केल्यानंतर सर्वजण माझ्या विरोधात पीडितेच्या बाजूने बोलत आहेत. या आरोपांबद्दल मी पीडितेला दोष देणार नाही. पीडितेने आरोप केलेल्या शिवसेनेचा नेता रघुनाथ कुचिक याला शिक्षा होण्यासाठी सरकारने पावले टाकावीत एवढीच अपेक्षा आहे. तरुणीच्या आरोपाची राज्य सरकारने हव्या त्या यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी करावी. या चौकशीतून सत्य बाहेर यावे आणि पीडितेला न्याय मिळावा अशीच भावना असल्याचे चित्रा वाघ यांनी नमूद केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.