आपल्या सेक्युलर राजवटीत चर्च, मशिदी यांना शाळा सुरु करण्यासाठी परवानगी आहे, पण हिंदूंच्या मंदिरांना विद्यादान करण्यास निर्बंध आहे. शाळा उघडण्यास परवानगी नाही, असा गौप्यस्फोट निवृत्त प्रशासकीय अधिकारी लीना महेंदळे (Leena Mehendale) यांनी केला आहे.
दुसऱ्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचाही अधिकार नाही
‘हिंदुस्थान पोस्ट’च्या युट्यूब चॅनलच्या चर्चासत्रात लीना महेंदळे यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’चे संपादक स्वप्नील सावरकर यांच्याशी बोलताना वरील धक्कादायक माहिती दिली. या चर्चासत्रात महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट हेही सहभागी झाले होते. जी मंदिरे सरकारच्या ताब्यात आहेत, त्या मंदिरांना दुसऱ्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचाही अधिकार नाही, तसेच जी मंदिरे सरकारने ताब्यात घेतली नाहीत त्या मंदिरांना शाळा काढण्याचा अधिकार नाही. त्यासाठी सरकारचा निर्बंध आहे. पूर्वी मंदिरांचे पहिले काम विद्यादानाचे होते. पण आता मंदिरे सरकारच्या ताब्यात असोत किंवा नसोत ती मंदिरे शाळा काढू शकत नाही म्हणजेच विद्यादान करू शकत नाहीत, असे लीना महेंदळे (Leena Mehendale) म्हणाल्या.
(हेही वाचा नाना पटोले यांचे रा.स्व. संघाशी संबंध म्हणून काँग्रेस हरली; Congress च्या गोटातून गंभीर आरोप)
मंदिरांनी त्रिसूत्री कार्यक्रम करण्याचे आवाहन
1. शाळा सुरु कराव्यात
ज्या मंदिरांचे सरकारीकरण झाले नाही, अशा खासगी मंदिरांनी त्रिसूत्री कार्यक्रम करण्याचे आवाहन लीना महेंदळे यांनी केले. त्यात पहिले काम मंदिरांनी शाळा सुरू कराव्यात. सरकारने यासाठी परवानगी दिली नाही, पण यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी झगडावे. शिक्षणाचे काम सुरू करावे, असे लीना महेंदळे (Leena Mehendale) म्हणाल्या.
2. मंदिरांनी इतर मंदिरांचा जीर्णोद्धार करावा
दुसरे जी मंदिरे जीर्णोद्धारासाठी मागे पडली आहत, त्यांच्या जीर्णोद्धाराचा कार्यक्रम हाती घ्यावा. आज अहिल्याबाई होळकर मोठ्या का आहेत? कारण सगळीकडे नकारात्मक वातावरण असताना आणि काशी विश्वेश्वर मंदिरावर त्यांचा ताबा नसताना अतिशय नेटाने त्यांनी त्यांना जितका शक्य झाला तितका काशी विश्वेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यामुळे आज आपण त्या नगरीला विश्वनाथाची नगरी म्हणून संबोधित करतो, अन्यथा त्या मंदिराचे अस्तित्वही राहिले नसते, असेही लीना महेंदळे (Leena Mehendale) म्हणाल्या.
3. हिंदूंच्या तिसऱ्या संततीची जबाबदारी घ्यावी
सर्व हिंदूंच्या श्रद्धेचे प्रतीक म्हणजे भगवतगीता होय. ही गीता श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली. अर्जुन ज्ञानी, वीर, धनुर्धारी होता. त्याला श्रीकृष्णाने कर्तव्य बोध करून दिल्यावर अर्जुनाने पराक्रम करून दाखवला. हा अर्जुन तिसरी संतती होता. हिंदू मंदिरांनी निर्णय घ्यावा, जिथे जिथे तिसरी संतती असेल, त्या तिसऱ्या संततीला ज्ञानी, पराक्रमी, योद्धा बनवावे, याची जबाबदारी मंदिरांनी घ्यावी. ही त्रिसूत्री मंदिरांनी केली तर हिंदू धर्मीय आज जिथे आहेत त्या ठिकाणावरून कितीतरी पुढे जातील आणि तीच खरी विश्वगुरुता असेल, असेही लीना महेंदळे म्हणाल्या.
Join Our WhatsApp Community