मुंबईसह मोठ्या शहरांचे परप्रांतीयांमुळेच विकृत गुन्हेगारीकरण!

साकीनाका बलात्काराला जौनपूर पॅटर्न म्हणणे म्हणजे बलात्काराच्या गुन्ह्याचे प्रांतीयकरण केलेले नाही, तो एक वाक्प्रचार आहे, असे संजय राऊत म्हणाले.

79

आम्ही कधी वाद निर्माण करत नाही, शिवसेनेचा नेता बोलतो तेव्हा तो सडेतोडच बोलणार, त्यातून कुणाला प्रसिद्धी मिळवायची असते तेव्हा ते वाद निर्माण करतात, त्यांना काही काम नसते. मुख्यमंत्री परप्रांतीयांची नोंद करा, असे म्हणाले. त्यावरही काहींनी वाद निर्माण केला, त्यांना काही काम नाही, म्हणून ते वाद निर्माण करतात. मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. मुंबईत ज्या विकृत स्वरूपातील गुन्हेगारीकरण होताना दिसत आहे त्याला हे बाहेरून येणारे लोंढेही कारणीभूत आहेत. हा प्रश्न केवळ मुंबईचा नाही तर बंगळुरू, कोलकता या मोठ्या शहरांचाही आहे. शिवसेनाप्रमुखांनी तर मुंबईत येणाऱ्यांना ओळखपत्र द्या, असे म्हटले होते. मुख्यमंत्र्यांनी फक्त नोंद ठेवायला सांगितले आहे, त्यात विरोधी पक्षाच्या पोटात कळ येण्याचे काही कारण नाही. कळ आली तर गोळी देऊ, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले. टीव्ही ९ या वृत्त वहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

‘जौनपूर पॅटर्न’ हा वाक्प्रचार!

साकीनाका बलात्काराला जौनपूर पॅटर्न म्हणणे म्हणजे बलात्काराच्या गुन्ह्याचे प्रांतीयकरण केलेले नाही, तो एक वाक्प्रचार आहे. जसे विरोधी पक्षनेत्याने राष्ट्रवादी रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष, असे म्हणाले. त्याचे विश्लेषण करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, तो एक वाक्प्रचार आहे, तसाच हादेखील वाक्प्रचार आहे, असेही संजय राऊत म्हणाले. सामना संपादकीयातून भाजपाने गुजरातचा मुख्यमंत्री तडकाफडकी बदलण्यावरून टीका केली. त्यावर आमदार नितेश राणे यांनी ‘आधी मुंबईचा आयुक्त कोरोना काळात का बदलला याचे उत्तर द्या’, असे म्हटले. त्यावर बोलताना राऊत यांनी, ‘मुंबई महापालिकेचा आयुक्त बदलून जमाना झाला. अधिकारी बदलणे आणि मुख्यमंत्री बदलणे यात फरक आहे, राजकरणात काम करणाऱ्यांना हे कळायला पाहिजे. आयुक्त बदलणे हा राज्याचा अधिकार आहे. त्यांना निलंबित केले नाही, उलट त्यांना बढती मिळाली, केंद्राने त्यांना घेतले’, असे राऊत म्हणाले.

(हेही वाचा : वीर सावरकर आमच्यासाठी दैवत, त्यांचा अवमान सहन करणार नाही!)

महाराष्ट्रातून उद्योग पळवणे म्हणजे गुजरात मॉडल!

भाजपा जिथे आवश्यकता आहे, तिथे मुख्यमंत्री बदलत नाही. गुजरातमध्ये मुख्यमंत्री बदलावा लागला हे महत्वाचे आहे. विकासाचे मॉडेल म्हणून सांगितले होते, काय होते मॉडेल, महाराष्ट्रातील उद्योग पळवले आणि तिथे नेले. गुजरात हे महाराष्ट्राचे जुळं भावंडं आहे. गेल्या काही काळापासून गुजरात आणि महाराष्ट्र यांच्या सातत्याने भांडण लावण्याचा प्रयत्न झाला हे दुर्दैव आहे. देशात काही झाले तरी महाराष्ट्र आणि गुजरात एक राहिलेला आहे. मुंबईत तर अर्धे गुजरात आहे. आमचा त्यावर काही वाद झाला नाही, असेही संजय राऊत म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.