नागपूर विधानभवनातील शिवसेनेच्या कार्यालयावरून उद्धव आणि शिंदे गटात चढाओढ

एकीकडे शिवसेना कुणाची याचा निवडा प्रलंबित असताना आता नागपूर विधानभवनातील कार्यालय मिळवण्यावरून उद्धव आणि शिंदे गटात चढाओढ सुरू झाली आहे. सध्या वाद टाळण्यासाठी प्रशासनाने या कार्यालयाचा फलक झाकून ठेवला असला, तरी हिवाळी अधिवेशनात हे कार्यालय कोणाला मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

(हेही वाचा – इंडोनेशियाची ‘सिनार्मस’ कंपनी राज्यात करणार २० हजार कोटींची गुंतवणूक)

नागपूर विधानभवन परिसरात सर्व प्रमुख राजकीय पक्षांची कार्यालये आहेत. १९ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाकरिता विधानभवन परिसरात रंगरंगोटीसह विविध कामे सुरू आहेत. भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या विधिमंडळ पक्ष कार्यालयाचे फलक स्पष्टपणे दिसत आहेत. मात्र, शिवसेना पक्ष कार्यालयाच्या फलकावर ‘पडदा’ टाकण्यात आला आहे़. विशेष म्हणजे भाजपाच्या बाजूला शिवसेनेचे कार्यालय आहे.

शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून या कार्यालयावर दावा सांगितला जात आहे. त्यामुळे संभाव्य वाद टाळण्यासाठी पावसाळी अधिवेशनाप्रमाणे हे कार्यालय सील केले जाण्याची शक्यता अधिक आहे. पावसाळी अधिवेशनात शिवसेनेच्या दोन्ही गटांना वेगवेगळी कार्यालये देण्यात आली होती.

दोन वर्षांनी नागपुरात

नागपुरात १९ डिसेंबरपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे़. यापूर्वी २०१९ मध्ये नागपुरात हिवाळी अधिवेशन झाले होते. गेली दोन वर्षे कोरोना संकटामुळे नागपुरात हिवाळी अधिवेशन होऊ शकले नाही. दोन वर्षानंतर होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाची तयारी जोरात सुरू आहे़.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here