खरी शिवसेना कोणाची एकनाथ शिंदेंची की उद्धव ठाकरेंची यावरून राज्यात अद्याप संघर्ष सुरूच आहे. यावर अनेक ठिकाणी त्याचे पडसाद पाहायला मिळत आहे. आता तर हा वाद टोकाला गेल्याचे दिसून आले आहे. या दोन्ही गटातील धुसफूस आता वाढू लागली असून मुंबईतील प्रभादेवी परिसरात गणेश विसर्जनादरम्यान, शिंदे गट आणि शिवसेनेत झालेल्या वादानंतर रविवारी मध्यरात्री मोठा राडा झाला. यावेळी दादर पोलीस स्टेशन परिसरातही दोन्ही गट समोरासमोर भिडले. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी हवेत गोळीबार केला, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. मात्र हा आरोप सदा सरवणकर यांनी फेटाळून लावला आहे. मध्यरात्री सुरू असलेला वाद पहाटे चार वाजता संपला. पोलिसांच्या चौकशीनंतर सरवणकर पहाटे चार वाजता पोलीस स्टेशन बाहेर पडले. या प्रकारामुळे प्रभादेवी परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
काय घडला प्रकार
गणेश विसर्जनादरम्यान, शिंदे गटात असलेले माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि वरळीतील शिवसेनेच्या माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर यांच्यात वाद झाला. यावेळी दोघात शाब्दिक वाद झाले. त्यानंतर शनिवारी शिवसेनेच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
(हेही वाचा – फक्त हिंदू समाजानेच सगळे सहन करायचे का? – आमदार नितेश राणे)
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटात असलेले संतोष तेलवणे यांनी गणेश विसर्जनादरम्यान झालेल्या वादाबाबत फेसबुकवर आणि व्हॉट्सअपच्या पोस्टमध्ये अपशब्द वापरले होते. यावरून शिवसैनिकांनी तेलवणे यांना मारहाण केली. यानंतर सरवणकर यांनी प्रभादेवी सर्कल जवळ गोंधळ घातला. त्याशिवाय पोलिसांशी देखील हुज्जत घातली. या प्रकारानंतर दादर पोलिसांनी दोन्ही गटाच्या काही जणांना ताब्यात घेतले. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांच्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केल्याची माहिती समोर आली आहे.
Join Our WhatsApp Community