उस्मानाबादमध्ये उद्धव गटाचे खासदार आणि आणि भाजपाचे आमदार एकमेकांना भिडल्याची माहिती समोर आली आहे. पीक विम्याच्या प्रश्नासंदर्भात बैठक सुरू असताना शनिवारी हा प्रकार घडला.
( हेही वाचा : ‘बेस्ट’ ई-टॅक्सी लवकरच येणार प्रवाशांच्या सेवेत; ओला-उबेरपेक्षा स्वस्तात होईल प्रवास! )
उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात पीक विम्याच्या प्रश्नासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्याला स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यात खडाजंगी झाली. पीकविमा देताना कंपन्यांकडून भेदभाव केला जातो. त्यामुळे प्रशानाकडून पंचनाम्याची पावती घेण्याचा सल्ला राणा पाटील यांनी शेतकऱ्यांना दिला. त्यावेळी प्रशासनाकडे पंचनाम्याच्या पावत्याच नाहीत, तर शेतकऱ्यांची फसवणूक का करताय? असा संतप्त सवाल खासदार निंबाळकर यांनी केला. त्यांना उत्तर देताना राणा पाटील यांनी त्यांचा ‘बाळा’ असा उल्लेख केला.
त्यामुळे संतापलेल्या ओमराजे यांनी ‘तू जास्त बोलू नकोस, तू तूझ्या औकातीत राहा, तुझी आणि तुझ्या खानदानाची औकात आणि संस्कार सर्वांनाच माहीत आहेत’, अशा शब्दांत ओमराजे निंबाळकर यांनी आमदार राणा पाटील यांना सुनावले. ३७४ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या पदरात पडत असताना विमा कंपनीचे हे लोकच एजंटगिरी करतात. सर्वोच्च न्यायालयाने पीकविमा देण्याचे आदेश दिल्यानंतरही ते दिले जात नसतील तर शेतकऱ्यांना वेठीस धरू नका, अशी मागणीही त्यांनी केली .
शेतकऱ्यांनी घातला गोंधळ
आमदार राणा पाटील यांनी या बैठकीसाठी काही शेतकऱ्यांना बोलावले होते. जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठकीसाठी सकाळी ११ वाजताची वेळ या ठरली होती. पण १ वाजले तरी बैठक सुरू झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी गोंधळ घालायला सुरवात केल्याने काही वेळासाठी वातावरण चांगलेच तापले होते.
Join Our WhatsApp Community