मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी १३ जुलैपर्यंत राज्य सरकारला मुदत दिली आहे, यानंतर पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे. (Maratha OBC Reservation) विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात या आंदोलनाचे पडसाद पहायला मिळाले. विधिमंडळात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून चर्चा झाली. सत्ताधारी गटातील आमदारांनी विरोधी पक्षातील आमदारांवर आरोप केले.
(हेही वाचा – Pune Crime : पुण्यात दारू पिऊन गाडी चालवल्यास होणार मोठी कारवाई; पोलिसांचा मोठा निर्णय)
आमदार अमित साटम यांचा विरोधकांवर आरोप
आज विधीमंडळात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपा आमदार अमित साटम यांनी विरोधी पक्षातील आमदारांवर टीका केली. “काल मराठा आरक्षणा संदर्भात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रात जातीच्या नावावर तेढ निर्माण होत आहेत, काही गावात मराठ्यांच्या लग्नाला ओबीसी जात नाहीत, ओबीसींच्या लग्नाला मराठे जात नसल्याचे वातावरण तयार झाले आहे. यामुळे या विषयावर तोडगा काढण्यासाठी सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आलेलं होतं. पण विरोधी पक्षांनी या बैठकीवर बहिष्कार घातला. विरोधी पक्षाला फक्त राजकारण करायचं आहे, असा आरोप आमदार अमित साटम यांनी केला. “मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास विरोधी पक्षाचा पाठिंबा आहे कि नाही हे जाहीर करावं, अशी मागणीही भाजपा आमदार अमित साटम यांनी केली. आरक्षणाबाबत साटम यांनी विरोधी पक्षांना आपली भूमिका जाहीर करण्याची मागणी केली.
मनोज जरांगे यांना आवाहन
आमदार आशिष शेलार यांनीही विरोधी पक्षांनी बैठकीवर बहिष्कार टाकून मराठा समाजाचा अपमान केल्याची टीका विरोधी पक्षांवर केली. या वेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर देत महायुतीवर गंभीर आरोपही केले. वडेट्टीवार म्हणाले, राजकारण कोण करत आहे हे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. महायुतीनेच मराठा आणि ओबीसीमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.
या वेळी सभागृहात जोरदार खडाजंगी झाली. भाजपा आमदार अमित साटम यांनी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांना विनंती केली. “विरोधी पक्षाला फक्त राजकारण करायचे आहे, जरांगे यांनी विरोधी पक्षाची काय भूमिका आहे हे पहावे”, असेही आमदार अमित साटम म्हणाले.
आरक्षणाच्या मुद्द्यावरून झालेल्या गोंधळामुळे विधानपरिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. याच मुद्द्यावरून विधानसभेचं कामकाज आधी ५ मिनिटं, नंतर १० मिनिटं आणि तिसऱ्यांदा थेट पाऊण तासासाठी तहकूब करावं लागलं. (Maratha OBC Reservation)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community