महाविकास आघाडीत ‘गृह’कलह!

येत्या काळात विरोधकांकडून कोणते ना कोणते विषय काढून शिवसेनेला त्रास देण्याचा प्रयत्न राहणार आहे. याचमुळे महत्वाचे गृहखातेच स्वतःकडे ठेवायचे का? याचा विचारविनिमय सध्या शिवसेनेमध्ये सुरू आहे.

82

सचिन वाझे प्रकरणावरुन आधीच बॅकफूटवर असलेल्या ठाकरे सरकारमधील अंतर्गत कलह देखील आता डोके वर काढू लागले आहेत. गेल्या काही महिन्यांतील गृहखात्याच्या आणि विशेषतः गृहमंत्र्यांच्या कारभारावर शिवसेना नाखूष असून, शिवसेनेचा डोळा आता या गृह खात्यावर आहे. राष्ट्रवादीकडे असलेले गृहखाते शिवसेनेकडे घ्यावे, असा एक मतप्रवाह सध्या शिवसेनेमध्ये आहे. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण असो किंवा सचिन वाझे प्रकरण असो, सर्वात जास्त बदनामी ही शिवसेनेची झाली. त्यामुळे येत्या काळात विरोधकांकडून कोणते ना कोणते विषय काढून शिवसेनेला त्रास देण्याचा प्रयत्न राहणार आहे. याचमुळे महत्वाचे गृहखातेच स्वतःकडे ठेवायचे का? याचा विचारविनिमय सध्या शिवसेनेमध्ये सुरू आहे. विशेष म्हणजे अंबानी स्फोटक प्रकरणातील सचिन वाझेंच्या कथित सहभागानंतर अनिल देशमुख यांच्याकडून पुन्हा एकदा अनिल परब यांच्या गृहखात्यातील हस्तक्षेपाचा मुद्दा देखील समोर आला आहे.

गृहखात्यात अनिल परबांची लुडबुड

सगळ्यात महत्वाचे म्हणजे राष्ट्रवादीकडे असलेल्या गृहखात्याच्या कारभारात शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचा हस्तक्षेप वाढत चालला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही तक्रार खुद्द शरद पवार यांच्याकडे केल्याची माहिती मिळत आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे देखील हा मुद्दा मांडल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचाः जळगावात शिवसेनेकडून भाजपचा टप्प्यात कार्यक्रम… महापालिकेवर ‘भगवा’ फडकला!)

याआधीही कलह

गृह विभागातील हस्तक्षेपावरुन कलह होण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही महिन्यांपूर्वी मुंबईतील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य रंगले होते. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काढलेल्या आदेशाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली होती. अखेर शरद पवार, अजित पवार आणि अनिल देशमुख यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची समजूत काढली होती. या काळात गृह खात्यातील अधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या अनेक बैठका अनिल परब यांच्या बंगल्यावर पार पडल्या, अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे.

गृहविभाग राष्ट्रवादीकडे पण बदनामी शिवसेनेची

सुशांत सिंह राजपूत १४ जूनला मृतावस्थेत आढळला होता आणि साडेतीन महिन्यांनंतरही त्याच्या मृत्यूचे गूढ कायम होते. या प्रकरणी सुरुवातीला मुंबई पोलिस तपास करत होते. मुंबई पोलिसांनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, अभिनेत्री कंगना राणावत, भाजपचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी आणि राज्यातील भाजप नेत्यांनी सुशांतची हत्या झाल्याचा दावा केला होता. यात नंतर बिहार सरकारनेही उडी घेतली होती. बिहारमध्ये एफआयआर दाखल करुन, तेथील पोलिस पथक तपासासाठी मुंबईत दाखल झाले होते. हा तपास सीबीआयकडे सोपवावा, यासाठी विरोधी पक्ष भाजपने आणि बिहार सरकारने आक्रमक भूमिका घेतली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे सोपवला होता. या प्रकरणी तपास सोपवून दीड महिना उलटूनही, सीबीआयला सुशांतच्या मृत्यूचे कारण सांगता आलेले नाही. यावरुन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीबीआयवर ताशेरे ओढले होते. मात्र एकूणच या प्रकरणात सर्वात जास्त बदनामी झाली ती शिवसेनेचीच.

(हेही वाचाः अखेर परमबीर सिंग यांची उचलबांगडी! हेमंत नगराळे मुंबई पोलीस आयुक्त! )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.