आता मोफत लसीवरुन ठाकरे सरकारमध्ये ‘रस्सीखेच’!

97

1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पण आता या लसीकरणावरुन ठाकरे सरकारमधील मंत्र्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला असल्याची घोषणा, राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केली आणि कॉंग्रेस नाराज झाली. त्यातच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील आधी ट्वीट केले आणि नंतर ते डिलीट केले, यावरुन आता नागरिकांमध्ये तर संभ्रम निर्माण झाला आहेच, पण राज्यातील राजकारण तापायला देखील मुद्दा मिळाला आहे.

महसूल मंत्र्यांनी खडसावले

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नवाब मलिक यांच्या घोषणेवरुन नाराजी व्यक्त केली असून, मोफत लसीकरणाबाबतची आमची भूमिका स्पष्ट आहे. आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनीही मोफत लसीकरण करण्याचा आग्रह धरला आहे. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे तशी बाजूही मांडली आहे. आमची मागणी मान्य होईल, अशी आशा आहे. पण मुख्यमंत्री मोफत लस देण्याबाबत विचार करत असतानाच, श्रेय घेण्यासाठी कोणी हा निर्णय जाहीर करत असेल तर ते चुकीचे आहे. आम्हाला हा प्रकार आवडलेला नाही. काँग्रेसची त्यावर तीव्र नाराजी आहे, असे थोरात म्हणाले. मोफत लसीकरणाच्या श्रेयाची लढाई सुरू आहे, ती योग्य नाही. हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच जाहीर केला पाहिजे. कुणीही श्रेयासाठी घोषणा करणे योग्य नाही, असेही थोरात म्हणाले. 

(हेही वाचाः राज्यातील १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस! महाविकास आघाडी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय)

काय म्हणाले होते नवाब मलिक?

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना, राज्यातील जनतेचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट केले होते. मागच्या कॅबिनेटमध्ये लसींच्या मोफत वाटपाबाबत एकमत होत, राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी होकार दिला होता. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा तसे जाहीर केले आहे, असेही नवाब मलिक यांनी सांगितले होते. दरम्यान मोफत लसीकरणासाठी लवकरात लवकर टेंडर काढण्यात येणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले होते.

आदित्य ठाकरेंचे आधी ट्वीट नंतर डिलीट

नवाब मलिक यांनी मोफत लसीकरणाची घोषणा केल्यानंतर, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही ट्वीट करुन मोफत लसीकरणाची घोषणा केली होती. राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आमचे कर्तव्य म्हणून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे, असं आदित्य यांनी ट्वीटमध्ये म्हटले होते. मात्र, त्यानंतर हे ट्वीट त्यांनी डिलीट केले होते.

पडळकरांनी आदित्य ठाकरेंना डिवचले

भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी ट्वीट करुन आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. बिघाडी सरकारचे लाडके मंत्री आदित्य ठाकरे यांचे ट्वीट वाचून आनंद झाला. पण तो काही क्षणातच विरला. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणारे तुम्ही आहात, ‘वाटाघाटीʼ आणि ‘टक्केवारीमुळेʼ लोकहितासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी जाहीर केलेला मोफत लसीकरणाचा निर्णय वापस घेऊ नये, हीच अपेक्षा, असा टोला पडळकर यांनी लगावला आहे.

निरुपम म्हणाले, अभी ज़रा बाज़ आएँ

राज्यात तीन पक्षाचं सरकार आहे आणि मोफत लसीकरण करण्याची घोषणा एकट्या राष्ट्रवादीकडून केली जात आहे. थोडंस वेगळं वाटतंय. मोफत लसीकरणाचा निर्णय योग्य आहे. पण त्याची घोषणा सरकार करणार की केवळ एक मित्र पक्ष करणार? भीषण महामारीत क्रेडिट घेण्याचं राजकारण अत्यंत वाईट आहे. राष्ट्रवादीने असे प्रकार करू नयेत, अभी ज़रा बाज़ आएँ।, अशा शब्दांत संजय निरुपम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना कानपिचक्या दिल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.