‘हिजाब’वरुन महाविकास आघाडीत पडणार वादाचं ‘तेजाब’?

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांमध्ये मतभेद असल्याचे दिसत आहे.

133

आजवर राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये अनेकदा मिठाचा खडा पडल्याचे पहायला मिळाले आहे. कर्नाटकातील हिजाब प्रकरणावरुन देखील ठाकरे सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांमध्ये मतभेद असल्याचे दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी हिजाबला आपला पाठिंबा दर्शवला, तर मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव व ठाकरे सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिक्षण संस्थांमध्ये राजकारण आणू नका, असं मत व्यक्त केलं आहे. राष्ट्रवादीच्या इतरही अनेक नेत्यांनी हिजाबचे समर्थन केले आहे. त्यामुळे आता हिजाब प्रकरणावरुन आघाडी सरकारमध्ये वादाचं तेजाब तर पडणार नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

(हेही वाचाः शाळेत हिजाब घालायचा का? उच्च न्यायालय काय सांगतंय? वाचा…)

काय म्हणाले नवाब मलिक?

देशात कोणी काय खावं आणि कोणी काय परिधान करावं हे ठरवण्याचा प्रत्येक नागरिकाला हक्क आहे. त्यामुळे भाजपाकडून नागरिकांच्या मुलभूत हक्कांचे उल्लंघन केले जात आहे. मुस्लिम विद्यार्थिनी शाळेत जाऊन समाजात आपलं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत याचा भाजपाला त्रास होत आहे का, असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे. ‘बेटी पढाओ’चा भाजपा सरकारला विसर पडला आहे का, असं म्हणत नवाव मलिक यांनी भाजपा सरकारवर टीका केली आहे.

(हेही वाचाः हिजाब प्रकरणाचे दुसऱ्या दिवशीही महाराष्ट्रात उमटले पडसाद )

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी मात्र याबाबत आपलं वेगळं मत प्रस्थापित केलं आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ठरवून दिलेले गणवेशच विद्यार्थ्यांनी परिधान करावेत. शैक्षणिक संस्थांमध्ये केवळ आणि केवळ शिक्षणालाच महत्व देण्यात यावं. धार्मिक किंवा राजकीय विषयांपेक्षा फक्त शालेय विषयांकडेच शाळेत लक्ष देण्यात यावं, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.

(हेहा वाचाः हिजाब प्रकरणी आदित्य ठाकरेंचे मोठे विधान! म्हणाले…)

हे प्रकार महाराष्ट्रात खपवून घेतले जाणार नाहीत- चाकणकर

हा देश डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानावर चालतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा त्यातील सर्वात महत्वाचा अधिकार आहे, असं मला वाटतं. त्यामुळे कुणी काय परिधान करावं आणि काय नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. झुंडशाहीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जर कर्नाटकसारखे प्रकार केले तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत, अशा शब्दांत महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाजपाला इशारा दिला आहे.

(हेही वाचाः “गोव्यात स्थिर सरकार देण्याची ताकद फक्त भाजपमध्येच…”)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.