राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांमधील पक्षांतर्गत कुरघोडी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. रविवारी नवी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रवादीतील नाराजीनाट्य पुन्हा एकदा समोर आले आहे. या बैठकीदरम्यान अजित पवार हे व्यासपीठावरुन निघून गेल्यामुळे राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.
…अन् अजित पवार निघून गेले
या राष्ट्रीय अधिवेशनावेळी राष्ट्रवादीचे सर्व मोठे नेते भाषण करणार होते. शरद पवार भाषण करण्यापूर्वी अमोल कोल्हे भाषण करतील अशी घोषणा करण्यात आली. त्यानंतर जयंत पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्यानंतर जमलेल्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांनी भाषण करावे, अशी मागणी करायला सुरुवात केली. तेव्हा पाटील यांच्यानंतर अजित पवार भाषण करतील असे सांगण्यात आले. हे कळताच अजित पवार हे व्यासपीठावरुन उठून मागे निघून गेले. तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये एकच चुळबुळ सुरू झाली.
(हेही वाचाः राणे म्हणतात फडणवीस हिंदुहृदयसम्राट, पण आशिष शेलारांचे मत काय?)
पटेलांची सारवासारव
खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील अजित पवार यांची समजूत काढत त्यांना भाषणासाठी विनंती केल्याचे सांगण्यात येत आहे. पण तरीही अजित पवार यांनी भाषण केले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांची नाराजी लक्षात घेऊन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. आता अजित दादांच्या नावाची तुम्ही आधीच घोषणा केली. अजित पवार इतका वेळ इथे बसून होते पण तुमच्यामुळे ते बाहेर निघून गेले, आपण त्यांना पुन्हा बोलावू. ते वॉशरुमला गेले आहेत. शरद पवार यांचे भाषण व्हायच्या आधी ते येतील. तोपर्यंत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नव्या झेंड्याचे आपण अनावरण करुया, असे म्हणत प्रफुल्ल पटेल यांनी वेळ मारुन नेली.
Join Our WhatsApp Community