मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी राज्यातील सर्व विभागातील अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन त्यांना सात कलमी कार्यक्रम आखून दिला आहे. त्यासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांचा या बैठकीत समावेश होता. राज्यातील प्रशासनाला येत्या शंभर दिवसांत प्राधान्याने करावयाच्या कामांच्या बाबत अवगत करून देण्यात आले आहे. त्यांचा १५ एप्रिल २०२५ला आढावा घेतला जाणार आहे.
(हेही वाचा Dhananjay Munde यांच्या अडचणी वाढणार; करुणा मुंडेंची उच्च न्यायालयात धाव)
या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह सर्व मंत्री उपस्थित होते. बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, आपल्या कार्यालयाचे संकेतस्थळ सुसज्ज करा, माहिती अधिकार कायद्यानुसार मागितली जाईल अशी सर्व माहिती अगोदरच संकेतस्थळावर उपलब्ध करून द्या. संकेतस्थळ सायबरदृष्ट्या सुरक्षित करा. शासकीय कार्यालयांची स्वच्छता करा, अनावश्यक कागदपत्रे काढून टाका, खराब आणि वापरात नसलेली वाहने निर्लेखित करावीत असे आदेश त्यांनी दिले. त्याशिवाय शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह स्वच्छ राहतील, हे सुनिश्चित करा. अधिकाऱ्यांच्या अचानक भेटी होतील, त्यावेळी ते स्वच्छ दिसले पाहिजे. नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे यासाठी किमान दोन सुधारणा, नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या कार्यालयात राबविण्यात यावेत. प्रलंबित कामांची संख्या शून्यावर कशी येईल, याचा प्रयत्न करा. अधिकारी नागरिकांना कधी उपलब्ध असतील याची माहिती फलकावर नमूद करा अशा सूचनाही फडणवीसांनी (CM Devendra Fadnavis) अधिकाऱ्यांना दिल्या.
Join Our WhatsApp Community