-
खास प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे सरकारच्या काळातील आरोग्य विभागाच्या ३,२०० कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती दिली. या निर्णयाचे सत्ताधारी तसेच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी स्वागत केले असून माजी मंत्री आणि शिवसेना (शिंदे) आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यांचे पडसाद सोमवारी, ३ मार्च २०२५ पासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उमटण्याची शक्यता आहे.
अडीच वर्षाचा कार्यकाळ
एकनाथ शिंदे यांनी २०२२ मध्ये शिवसेनेत बंड केल्यानंतर भाजपाने त्यांना पाठिंबा देत मुख्यमंत्री केले. त्यानंतर शिंदे यांच्या मंत्रिमंडळात तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्याकडे आरोग्य खात्याचा कार्यभार देण्यात आला. शिंदे यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात आरोग्य विभागाने केलेल्या ३,२०० कोटींच्या कामाला फडणवीस यांनी आता स्थगिती दिली आहे.
(हेही वाचा – BMC : सुरक्षा दलातील अधिकारी, कर्मचारी महानगरपालिका सेवेत कायम तत्पर; उपायुक्त चंदा जाधव यांनी केले कौतुक)
अनुभव नसताना कंत्राट मंजूर
सावंत (Tanaji Sawant) यांच्या मंत्रिपदाच्या काळात अधिकाऱ्यांच्या बदल्या, अँब्युलन्स खरेदीसह कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे अशा ठिकाणी बाह्य यंत्रणेद्वारे सफाई करण्याचा वार्षिक करार करण्यात आला होता. कामाचा कोणताही अनुभव नसताना कंपनीला यांत्रिकी साफसफाईचे कंत्राट दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
शिवसेनेकडूनही स्थगितीचे स्वागत
सध्या सावंत (Tanaji Sawant) यांच्या कार्यकाळातील कामांना स्थगिती देण्यात आली असली तरी यापुढे इतरही काही तक्रारी मुख्यमंत्री कार्यालयाकडे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेना (शिंदे) पक्षाचे आमदार आणि विद्यान मंत्री संजय शिरसाट यांनी फडणवीस यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच चुकीचे काम करणारा मग तो कुणीही असो त्याच्यावर कारवाई व्हायला हवी, अशी आपली भूमिका असल्याचे शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
(हेही वाचा – सरकारी योजना चालवण्यासाठी हिमाचलमधील Congress Government चा मंदिरांच्या पैशावर डोळा)
पवारांनी पुढे केले एक प्रकरण
राष्ट्रवादी काँग्रेस (शप) गटाचे आमदार रोहित पवार यांनी फडणवीस यांच्या निर्णयाचे स्वागत केले असून एक मागणीही पुढे सरकवली. “अशाच प्रकारे अँब्युलन्स खरेदीत झालेल्या घोटाळ्याची पाळेमुळेही खणून काढावीत आणि ‘भ्रष्टाचाराच्या खेकड्या’ने खाल्लेली दलाली व्याजासह वसूल करावी, ही विनंती! सोबतच मागील सरकारमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची फाईल जोडत आहे, याचीही सखोल चौकशी करून राज्याची तिजोरी कुरतडणाऱ्यांना अद्दल घडवली तर पुन्हा नांगी वर करण्याची त्यांची हिम्मत होणार नाही,” असे रोहित पवार यांनी ‘X’ वर पोस्ट केली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community