CM Eknath Shinde : राज्यात २९ हजार रोजगार निर्मिती होणार; १ लाख १७ हजार कोटीच्या गुंतवणुकीला मान्यता

76
CM Eknath Shinde : राज्यात २९ हजार रोजगार निर्मिती होणार; १ लाख १७ हजार कोटीच्या गुंतवणुकीला मान्यता
CM Eknath Shinde : राज्यात २९ हजार रोजगार निर्मिती होणार; १ लाख १७ हजार कोटीच्या गुंतवणुकीला मान्यता

राज्यात येऊ घातलेले उद्योग गुजरातला पळवले जात असल्याची टीका होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी गुरुवारी राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पुणे, पनवेल येथे १ लाख १७ हजार २२० कोटी रुपये गुंतवणुकीच्या उच्च तंत्रज्ञानावर आधारित चार विशाल प्रकल्पांना मान्यता दिली. यामुळे सुमारे २९ हजार रोजगार निर्मिती होणार असून मान्यता मिळालेल्या प्रकल्पांमुळे राज्यात सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रीक वाहन निर्मितीमध्ये मोठया प्रमाणात गुंतवणूक, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. यामुळे महाराष्ट्राची ओळख ही इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रामध्ये अग्रेसर राज्य अशी होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्रात होऊ घातलेल्या प्रकल्पाना मान्यता देण्यात आली. या प्रकल्पांमुळे तांत्रिक नवकल्पना, संशोधन आणि विकासाला चालना मिळून एक मजबूत स्थानिक पुरवठा साखळी विकसित होण्यास मदत होणार आहे. सुक्ष्म,लघू आणि मध्यम उद्योग घटकांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल. स्थानिक कामगारांसाठी प्रशिक्षण आणि कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध होणार असून त्यांची रोजगारक्षमता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानातील कौशल्य वाढण्यास मदत होणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. (CM Eknath Shinde)

(हेही वाचा – Cabinet Meeting : अंगणवाडी केंद्रांना सोलर सिस्टिम देणार)

टॉवर सेमीकंडक्टर कंपनीचा उच्च तंत्रज्ञानावर आधारित सेमीकंडक्टर निर्मितीचा अतिविशाल प्रकल्प पनवेल जि.रायगड येथे करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये पहिल्या टप्प्यात ५८ हजार ७६३ कोटी तर दुसऱ्या टप्यात रूपये २५ हजार १८४ कोटी अशी एकूण ८३ हजार ९४७ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. याप्रकल्पामुळे १५ हजार रोजगारनिर्मिती होणार आहे.

स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया कंपनीचा प्रकल्प पुणे येथे एकात्मिक पध्दतीने स्थापना करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये एकूण १२ हजार कोटी एवढी गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे एक हजार रोजगार निर्मिती होणार असून प्रकल्पातून अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित इलेक्ट्रीक व्हेईकलचे निर्मिती केली जाणार आहे.

टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीचा प्रकल्प राज्याचे इलेक्ट्रीक वाहन प्रोत्साहन धोरणांतर्गत इलेक्ट्रीक वाहन निर्मितीचा अतिविशाल प्रकल्प छत्रपती संभाजीनगर येथे सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये एकूण २१ हजार २७३ कोटी एवढी गुंतवणूक होणार असून त्यामाध्यमातून १२ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पामुळे तांत्रिक नवकल्पना, संशोधन आणि विकासाला चालना मिळून एक मजबूत स्थानिक पुरवठा साखळी विकसित होईल.

(हेही वाचा – विधानसभेसाठी शिवसेनेची लाडक्या बहिणीवर मदार; असे का म्हणाले Sanjay Nirupam?)

मराठवाड्यातील सुक्ष्म,लघू आणि मध्यम उद्योग घटकांना त्याचा फायदा होणार आहे. इलेक्ट्रीक वाहनाच्या वापरामुळे हरितगृह वायू उत्सर्जन लक्षणीयरीत्या कमी होऊन हवेची गुणवत्ता आणि हवामान बदल कमी होण्यास हातभार मिळणार आहे. यापूर्वी जेएसडब्ल्यु ग्रीन मोबिलीटी यांचा छत्रपती संभाजीगनर येथे इलेक्ट्रीक वाहन निर्मितीच्या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटर यांचा इलेक्ट्रीक वाहन निर्मितीमध्ये मोठया प्रमाणात गुंतवणूक होणारा छत्रपती संभाजीनगर येथील दुसरा अतिविशाल प्रकल्प असून या क्षेत्राचा सर्वंकष विकास होण्यास चालना मिळणार आहे.

रेमंड लक्झरी कॉटन्स यांचा वस्त्रोद्योग धोरणांतर्गत स्पिनींग, यार्न डाइंग, विव्हींग ज्यूट, विव्हींग कॉटन, ज्यूट, मेस्टा, कॉटन ह्या उत्पादनांच्या निर्मितीचा विशाल प्रकल्प अतिरिक्त औद्योगिक विकास महामंडळ नांदगाव पेठ, जि.अमरावती येथे होणार आहे. याप्रकल्पात १८८ कोटी एवढी गुंतवणूक आणि ५५० रोजगार निर्मिती होणार आहे.

मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित होते. उद्योग मंत्री उदय सामंत दरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आदी उपस्थित होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.