CM Eknath shinde : ३ लाख १६ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार ८४ हजार रोजगार निर्माण होणार

227
CM Eknath shinde : ३ लाख १६ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार ८४ हजार रोजगार निर्माण होणार
CM Eknath shinde : ३ लाख १६ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार ८४ हजार रोजगार निर्माण होणार

दावोस येथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत राज्य सरकारने विविध उद्योग समूहांशी ३ लाख ५३ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केले असताना सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तब्बल ३ लाख १६ हजार ३०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार करण्यात आले. ही गुंतवणूक आल्यानंतर राज्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष असे एकूण ८४ हजार रोजगार निर्माण होणार असल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे. आज झालेल्या सामंजस्य करारानुसार हरित हायड्रोजन निर्मितीसाठी २ लाख ७६ हजार ३०० कोटी तर पोलाद प्रकल्प उभारण्यासाठी ४० हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

हरित हायड्रोजन ही काळाची गरज असून त्यासाठी महाराष्ट्र सरकारने आज सात प्रकल्पांसाठ विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार केले. यामाध्यमातून ६४ हजार रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांनी येथे दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरित हायड्रोजनवर लक्ष केंद्रित केले आहे. केंद्र सरकारच्या हरित हायड्रोजन मिशनच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्य सरकारने “हरित हायड्रोजन धोरण-२०२३” जाहीर केले आहे. त्याद्वारे २०३० पर्यंत ५०० केटीपीए इतका हरित हायड्रोजन निर्मितीचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या वतीने हरित हायड्रोजन विकासकांना विविध अनुदान सवलती देऊ केलेल्या आहेत. महाराष्ट्र उद्योग स्नेही असून आवश्यक ते पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ असल्याने राज्यात गुंतवणुक मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे आणि महाराष्ट्र हरित हायड्रोजन परिसंस्थेमध्ये अग्रेसर बनविण्याचे उद्दिष्ट असल्याचेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.

अर्सेलर मित्तल निप्पोन स्टील इंडिया कंपनी सोबत करार

महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी राज्यात सहा एमटीपीए क्षमतेचा एकात्मिक पोलाद प्रकल्प उभारण्याकरीता अर्सेलर मित्तल निप्पोन स्टील इंडिया कंपनी सोबत ४० हजार कोटी गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला असून यामुळे २० हजार प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

राज्यातील लोह खाणींना हा जोडणारा हा प्रकल्प राज्याच्या औद्योगिक विकासात महत्वाचे योगदान देणारा आहे. महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण असून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. नुकत्याच दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये राज्यात सुमारे ३ लाख ५३ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले आहे. महाराष्ट्रात असलेल्या पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ यामुळे औद्योगिक विकास वेगाने होत आहे. थेट परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र देशात अग्रस्थानी असल्याचे शिंदे म्हणाले.

आज झालेला सामंजस्य करार हा अविस्मरणीय क्षण आहे. राज्यात असलेल्या पोषक वातावरणामुळे गुंतवणुक वाढत असून महाराष्ट्रात सध्या अतिविशाल पायाभूत प्रकल्प सुरू आहेत. देशात सुरू असलेल्या मोठ्या पायाभूत प्रकल्पांपैकी सुमारे ३५ टक्के प्रकल्प महाराष्ट्रात सुरू असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

हरित हायड्रोजनसाठी गुंतवणूक करणाऱ्या कंपन्याच्या सात प्रकल्पांची क्षमता ९१० केटीपीए (किलो टन्स पर अनम) असून त्यामुळे ६४ हजार रोजगार निर्मिती होऊन प्रति वर्ष ५११ कोटी कि.लो. ग्रॅम. कार्बन उत्सर्जनात कपात होईल. यापासून सुमारे ४ हजार ७३२ केटीपीए हरित अमोनिया निर्मिती होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.