मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी राजभवनावर घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट

101

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी रात्री राजभवनावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. आदित्यनाथ हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवनावर योगी आदित्यनाथ यांचे स्वागत केले. यावेळी शिंदे-फडणवीसांसह उत्तरप्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक व गोरखपूरचे खासदार रवि किशन उपस्थित होते. राज्यपालांनी योगी आदित्यनाथ यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट दिली.

( हेही वाचा : निवासी डॉक्टरांच्या बेमुदत संपाला का मिळाला अल्प प्रतिसाद? )

उत्तर प्रदेशात औद्योगिक वाढविण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बुधवारी दुपारी मुंबईत दाखल झाले. मुंबईतील नामांकित ज्येष्ठ उद्योगपती आणि उद्योगसमूहांसोबत बैठका घेऊन ते चर्चा करणार आहेत. उत्तर प्रदेशातील गुंतवणूक संधी आणि राज्य सरकारकडून त्यांना मिळणाऱ्या विशेष सवलती याबाबत माहिती देऊन उद्योगांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

मुंबई दौऱ्याचे कारण काय?

योगी आदित्यनाथ हे आपल्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यात टाटा समूह, रिलायन्स इंडस्ट्रीज, अदानी समूह, पिरामल, महिंद्रा, गोदरेज, आदित्य बिर्ला समूह, बाँबे डाइंग, ब्रिटानिया, जेएसडब्ल्यू समूह, एशियन पेंट्स, हिताची, हिरानंदानी, कोका-कोला, मारुती सुझुकी, अशोका लेलँड्स, ओस्वाल इंडस्ट्रीजसह अनेक कंपन्यांचे उच्चपदस्थ अधिकारी आणि ज्येष्ठ उद्योगपतींशी चर्चा करणार आहेत.

शिवाय महाराष्ट्रात वास्तव्य असलेल्या उत्तर प्रदेशातील मान्यवरांशी ते चर्चा करतील. उत्तर प्रदेशात चित्रनगरी (फिल्मसिटी) उभारण्यात येत असून त्यादृष्टीने बॉलीवूडमधील ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक, कलावंत आदींशी ते चर्चा करणार आहेत.

त्याचबरोबर योगी आदित्यनाथ हे उद्योगपतींशी गुरुवारी दिवसभर चर्चा करून भेटीगाठी घेणार आहेत. अतिशय अविकसित राज्य असलेल्या उत्तर प्रदेशने गेल्या काही वर्षांत केलेली प्रगती आणि तेथील गुंतवणुकीच्या संधी व सवलतींबाबत योगी आदित्यनाथ उद्योगपती आणि उद्योगसमूहांच्या उच्चपदस्थांना माहिती देणार आहेत आणि गुंतवणुकीसाठी आमंत्रित करणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.