एकीकडे विरोधी पक्षातील नेते एकामागोमाग एक बैठका घेऊन निवडणुकीचा फॉर्म्युला निश्चित करण्याच्या प्रयत्नात असताना शिंदे-फडणवीसांमध्येही गुरुवारी रात्री वर्षा बंगल्यावर गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. दोन दिवसांची दिल्लीवारी, मंत्रिमंडळ विस्तार आणि लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप आदी मुद्द्यावर बैठकीत चर्चा झाल्याचे कळते.
बैठकीचा मुख्य अजेंडा लोकसभा निवडणुकीतील जागावाटपासंदर्भात होता. गुरुवारी रात्री शिवसेनेच्या सर्व १३ खासदारांची बैठक झाली. यात गेल्यावेळी शिवसेनेने जितक्या जागा लढवल्या होत्या, तितक्या यावेळेसही मिळायला हव्यात, अशी ठाम भूमिका सर्वांनी मांडली. त्यानुसार फडणवीसांसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २२ जागांचा प्रस्ताव ठेवला.
(हेही वाचा – ‘द केरल स्टोरी’च्या धर्तीवर संजय राऊत काढणार ‘हा’ चित्रपट)
त्यानुसार, आगामी लोकसभेसाठी भाजप २६, तर शिवसेनेने २२ जागा लढविण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली. यानंतर आणखी बैठका होऊन जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय होणार असल्याचे कळते.
दिल्ली दौऱ्याची तयारी
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या शनिवारी-रविवारी, २७ आणि २८ मे रोजी दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. नीती आयोगाची बैठक आणि नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाचे निमित्त यामागे असले, तरी या दौऱ्यात ते भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत.
- राज्यात महाविकास आघाडी आणि समविचारी पक्षांचे नेते सातत्याने एकमेकांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यामुळे मोदी-शहा महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. राज्यात येत्या काळात महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. त्यापाठोपाठ लोकसभा आणि विधानसभेच्याही निवडणुका होऊ घातल्या आहेत.
- भाजपाने सध्या महापालिकांसह लोकसभेवर लक्ष केंद्रित केले आहे. या दौऱ्यात शिंदे फडणवीस हे पक्षनेतृत्वाशी चर्चा करून राज्यातील राजकीय परिस्थितीची माहिती देतील. त्याची तयारी गुरुवारच्या वर्षा बंगल्यावरील बैठकीत करण्यात आल्याचे समजते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community