मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचे लोकार्पण उद्या, रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाची चाचणी घेतली. समृद्धी महामार्गाच्या पाहणीसाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्या दिवशी एकाच गाडीतून प्रवास केला. यावेळी सुरूवातीला एकनाथ शिंदे खूपच घाबरले होते. दरम्यान, हा अनुभव कसा होता, यावर बोलताना शिंदे म्हणाले, आमच्या टेस्ट ड्राईव्हची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतल्याचे त्यांनी सांगितले.
(हेही वाचा – पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘G20 अध्यक्षपद हे देशाचे सामर्थ्य दाखवण्याची एक अनोखी संधी अन्…’)
काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे
जेव्हा मी समृद्धी महामार्गाच्या पाहणीसाठी गेलो तेव्हा गाडी मीच चालवली. मात्र यावेळी देवेंद्रजींनी गाडी चालवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांची ड्रायव्हिंग मला माहिती नव्हती म्हणून सुरूवातीला जरा धाकधूक झाली, असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तर यासंदर्भात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही चौकशी केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ‘कैसा रहा सफर’ अशी विचारणा मोदींनी केल्याचे त्यांनी सांगितले.
नागपूर येथून समृद्धी महामार्गास प्रारंभ होत असून तेथून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी 4 डिसेंबर रोजी पाहणी दौरा केला. वर्धा जिल्ह्यात समृद्धीचा 55 किलोमीटरचा मार्ग असून या मार्गाची पाहणी करण्यात आली. यावेळी शिंदे बाजूला बसलेले असताना फडणवीसांच्या हाती गाडीचे स्टेरिंग असल्याचे पाहायला मिळाले. मात्र यावेळी एकनाथ शिंदेंची धाकधूक वाढली. हा किस्सा एका वाहिनीला शेअर करताना ते म्हणाले, “समृद्धी महामार्गावर याआधी मी ड्रायव्हिंग केलं आहे. त्यानंतर फडणवीसांचा ड्रायव्हिंगचा मूड झाला. तेच म्हणाले मी चालवतो तुम्ही बाजूला बसा. आता ड्रायव्हिंग न येणारा बाजूला बसला असेल तर त्याला भीती अजिबात नसते. पण मला ड्रायव्हिंग येत असल्यामुळे थोडी भीती वाटली होती. पण फडणवीसांनी कमाल ड्रायव्हिंग केलं. ते तर पट्टीचे ड्रायव्हर निघाले, असे ते म्हणाले.
मोदी म्हणाले, कैसा रहा सफर
पुढे शिंदे असेही म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना मी आता जेव्हा दिल्लीत भेटलो तेव्हा त्यांनीही समृद्धीवरील टेस्ट ड्राइव्हबाबत विचारणा केली. ते म्हणाले ‘कैसा रहा सफर, किधर है आपके साथी’… समृद्धी महामार्गासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींही उत्सुक असल्याचे म्हणाले.
Join Our WhatsApp Community