मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या शनिवारी-रविवारी, २७ आणि २८ मे रोजी दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. नीती आयोगाची बैठक आणि नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाचे निमित्त यामागे असले, तरी या दौऱ्यात ते भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेणार असल्याचे कळते.
नीति आयोगाची बैठक शनिवार, २७ मे रोजी दिल्लीत होत आहे. यासाठी राज्याचे प्रतिनिधी म्हणून सर्व मुख्यमंत्र्यांना उपस्थित राहावे लागते. त्यानुसार या बैठकीला शिंदे उपस्थित राहणार असून, फडणवीससुद्धा दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. त्यामुळे निमित्त नीती आयोगाच्या बैठकीचे असले तरी राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा होण्याचे संकेत मिळत आहेत.
(हेही वाचा – Hindutwa : शेंडी जानव्याचे हिंदुत्व म्हणजे काय रे भाऊ?)
राज्यात महाविकास आघाडी आणि समविचारी पक्षांचे नेते सातत्याने एकमेकांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यामुळे मोदी-शहा महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. राज्यात येत्या काळात महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. त्यापाठोपाठ लोकसभा आणि विधानसभेच्याही निवडणुका होऊ घातल्या आहेत. भाजपाने सध्या महापालिकांसह लोकसभेवर लक्ष केंद्रित केले आहे. या दौऱ्यात शिंदे फडणवीस हे पक्षनेतृत्वाशी चर्चा करून राज्यातील राजकीय परिस्थितीची माहिती देतील, असे कळते.
मंत्रिमंडळाची यादी आणि तारीख निश्चित होणार?
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर शिवसेनेच्या आमदारांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत. भाजपाचे आमदार मात्र मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चकार शब्द काढायला तयार नसले, तरी त्यांच्या मनातील सुप्त इच्छा लपून राहिलेली नाही. दुसरीकडे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन जुलैमध्ये होऊ घातले आहे. त्याआधी मंत्रिमंडळ विस्तार करून नवनिर्वाचित मंत्र्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ द्यावा, असे मत शिंदेंसह फडणवीसांचेही आहे. त्यामुळे या दिल्ली दौऱ्यात मंत्रिमंडळाची यादी आणि तारीख निश्चित केली जाईल, असे कळते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community