जूनमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील 40 आमदारांसह उठाव केला आणि हे सर्वजण गुवाहटी येथे गेले. त्यानंतर यावरुन राज्यातील सरकार कोसळणार अशा चर्चांना सुरुवात झाली आणि अवघ्या 10 दिवसांत एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.
त्यामुळे राज्यातील राजकारण फिरवण्यात गुवाहटीचा फार मोठा वाटा आहे. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा आपल्या समर्थक आमदारांना घेऊन गुवाहटी येथे जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
कामाख्या देवीचे घेणार दर्शन
मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थक आणदारांनी त्यावेळी आसाममधील प्रसिद्ध अशा कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते. त्यावरुनही त्यांच्यावर अनेक टीका करण्यात आल्या होत्या. याच कामाख्या देवीचे पुन्हा एकदा दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आपल्या 50 आमदारांसह गुवाहटी येथे जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत देवी पावणार का?
मुख्यमंत्री शिंदे हे कामाख्या देवीचे भक्त आहेत. त्यामुळेच मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कामाख्या देवीला साकडं घालण्यासाठी शिंदे आपल्या आमदारांसह गुवाहटीला जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे कामाख्या देवी ही मुख्यमंत्री शिंदे यांच्या हाकेला मुंबई महापालिका निवडणुकीतही धावून येणार का, अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत.
Join Our WhatsApp Community