अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी सत्ताधाऱ्यांच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत अजित पवारांनी शिंदे गटाच्या शिवसेनेवर आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी सरकारकडून जाहिरातीवर वारेमाप खर्च केला जात आहे. विकासकामांऐवजी उधळपट्टी सुरू आहे. गेल्या चार महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावरील जेवणाचे बील २ कोटी ३८ लाख रुपये आले आहे. एवढे बील कसे काय आले? सरकार चहामध्ये सोन्याचे पाणी टाकायचे का? असा खोचक प्रश्न अजित पवार यांनी केला होता. अजित पवारांचा या प्रश्नाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परखड उत्तर दिले आहे.
नक्की काय म्हणाले मुख्यमंत्री?
अधिवेशनापूर्वी रविवारी झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. वर्षा बंगल्यावरील खर्चाच्या बिलाबाबत अजित पवारांनी केलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘गेले अडीच वर्ष ‘वर्षा’ निवासस्थान बंद होते. आता गेल्या सहा-सात महिन्यापासून ते सुरू झालेले आहे. त्यामुळे राज्यभरातून लोकं येतात. दररोज हजारो लोकं येतात. तुम्ही साक्षीदार आहात त्यांचे. त्यामुळे जे लोकं येतात, त्यांना आल्यानंतर पाणी पण नाही द्यायच? चहा पण नाही द्यायचा? आम्ही काय बिर्याणी वगैरे देत नाही. पण चहापानी तर देऊ शकतो की नाही. आणि ही आपली संस्कृती, परंपरा आहे. चहापान्याचे अजितदादा तुम्ही काढताय. मला सांगा, ७० हजार कोटी तुम्ही पाण्यात घातले. ०.१ एवढी जमीन सुद्धा सिंचनाखाली आलेली नाही. हे मी नाही पृथ्वीराज चव्हाण वगैरे म्हणाले आहेत. मग त्याचा हिशोब आम्ही कधी विचारला का? पण तोही द्यावा लागेल.’
(हेही वाचा – अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा दिल्ली दौऱ्यावर)