शिंदे गटाने राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाला अधिकृत शिवसेनेचा दर्जा मिळवून देण्यासाठी झपाट्याने पावले उचलत आहेत. शिवसेनेच्या 12 खासदारांनी एकनाथ शिंदे यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर आता लोकसभेतही शिंदे गट आपले वर्चस्व निर्माण करणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्याचबाबत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे. संजय राऊत यांचा सकाळचा मॅटिनी शो आता बंद झाला आहे त्यामुळे ते काय बोलतात याची दखल घेण्याची गरज नसल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
(हेही वाचाः आता संसदेतील शिवसेना कार्यालयाचा ताबा घेण्याची शिंदे गटाची हालचाल)
त्यावर बोलण्याची गरज नाही
शिंदे गटासोबत आलेले शिवसेनेचे 12 खासदार हे केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावामुळे आले असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्याला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. हा आरोप इतर कोणी केला असता तर मी त्याची दखल घेतली असती. पण जे रोज सकाळी येतात आणि बोलतात, त्यांचा मॅटिनी शो आता बंद झाला आहे. त्यामुळे त्यावर आता मी काही बोलण्याची गरज नाही, असे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला आहे.
खासदारांचे आभार
दरम्यान, शिंदे गटाच्या 12 खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिले आहे. हे खासदार 20-25 लाख लोकांमधून निवडून येतात त्यांनी देखील आपल्या भूमिकेला पाठिंबा दिल्यामुळे आपण या सर्व खासदारांचे आभार मानत असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
(हेही वाचाः आता शिवसेना भवन होणार कोणाचे?)
Join Our WhatsApp Community