मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सोमवारी संभाजी नगर येथील पैठण येथे जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी विरोधकांचा जाहीर समाचार घेतला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे गट आणि सामनातील अग्रलेखावरल सुद्धा रोखठोक निशाणा साधला आहे. रोखठोकमधून शिंदे गट लाचार असल्याची टीका करण्यात आली. पण हिंमत असेल तर मुंबईत मराठी माणूस किती उरलाय याची आकडेवारी रोखठोकमधून जाहीर करा, असे थेट आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाला केले आहे.
शिंदेंचा रोखठोक हल्ला
काल परवा रोखठोक मध्ये कोणीतरी लिहिलं लाचार शिंदे गट, शिंदे गट म्हणजे साबणाचे बुडबुडे, अशा टीका करण्याशिवाय त्यांच्याकडे काही उरले नाही. शिंदे गटाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन भाजप मुंबई गिळवण्याचे काम करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. पण मी त्यांना एकच सांगेन की तुम्हाला जर का मुंबईचा इतकाच पुळका असेल आणि तुमच्यात हिंमत असेल, तर मुंबईमध्ये मराठी माणूस किती उरलाय याची आकडेवारी पुढच्या रोखठोकमध्ये जाहीर करावी, असे थेट आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाला केले आहे.
(हेही वाचाः ‘अजित पवार 6 वाजल्यापासून काम करतात, पण मी 6 वाजेपर्यंत काम करतो’, मुख्यमंत्र्यांचा टोला)
मराठी माणूस फक्त निवडणुकांपुरताच
गेली अनेक वर्षे तुम्ही मराठी माणसाच्या नावाने मुंबई महापालिकेत मतं मागितली. मग तो मराठी माणूस मुंबईतून बाहेर का फेकला गेला?, याचं विश्लेषण सुद्धा रोखठोकमधून करण्याचं धाडस करावं.फक्त निवडणूक आली की मराठीचा मुद्दा पुढे करायचा आणि निवडणूक संपली की आपला मराठी माणूस देशोधडीला का लागला याकडे दुर्लक्ष करायचे. मुंबईतल्या मराठी माणसाची दुःख जर आधी समजून घेतली असती तर मुंबईतील मराठी माणसाचा टक्का कमी झाला नसता, असा थेट हल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटावर केला आहे.
Join Our WhatsApp Community