नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ‘लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई विमानतळ’ असे नामकरण करण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. लोकभावना लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात नगरविकास मंत्री असताना, नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय स्वतः एकनाथ शिंदे यांनी घेतला होता. त्याबाबत विचारले असता शिंदे म्हणाले, नवी मुंबईच्या विकासामधील दि.बा. पाटील यांचे योगदान, स्थानिकांच्या विविध संघटनांची मागणी आणि लोकभावना विचारात घेऊन हा निर्णय घेतल्याचे शिंदे यांनी सांगितले.
मंत्रिमंडळाकडून मान्यता
दरम्यान, २९ जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीचे नामकरण प्रस्तावाच्या मंजूरीचे कार्यवृत्त मान्यतेसाठी नव्याने स्थापन झालेल्या मंत्रिमंडळासमोर आणण्यात आले होते. त्यावर हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी फेरसादर करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार हा प्रस्ताव शनिवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत फेरसादर करण्यात आला व त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार १२.५६ योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्वर्गिय. दि.बा. पाटील यांचे योगदान आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी संपादित जमिनीसाठी मोबदला ठरवण्याच्या अनुषंगाने निश्चित करण्यात आलेले २२.५ टक्के योजनेचे धोरणसुद्धा १२.५ धोरणाच्या धर्तीवर तयार करण्यात आले आहे. नवी मुंबई येथे सिडको महामंडळाच्या माध्यमातून ११६० हेक्टर क्षेत्रावर सार्वजनिक खाजगी भागीदारीतून ग्रीनफील्ड विमानतळ विकसीत करण्यात येत आहे. या संपूर्ण जमिनीचे संपादन पूर्ण झाले असून, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची भूविकास कामे प्रगतीपथावर आहेत.
Join Our WhatsApp Community