राहुल गांधींच्या यात्रेला भारत जोडो नव्हे, ‘भारत छोडो’ नाव द्या; मुख्यमंत्र्यांची टीका

186

भारताला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी ज्यांनी आपले आयुष्य वेचले, काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, ११ वर्षे अनन्वित अत्याचार सहन केले, त्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी राहुल गांधी यांनी अवमानास्पद वक्तव्य केले आहे. प्रखर राष्ट्रभक्तीचे प्रतिक असलेल्या सावरकरांविषयी गरळ ओकणाऱ्या राहुल गांधींच्या यात्रेला भारत जोडो नव्हे, ‘भारत छोडो’ नाव द्यायला हवे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

( हेही वाचा : सावरकरांचा अवमान करणाऱ्यांना जमिनीत गाडणार; देवेंद्र फडणवीस यांचा इशारा )

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वतीने विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात बुधवारी झालेल्या या कार्यक्रमात शिंदे बोलत होते. सावरकरांनी अतिशय हाल अपेष्टा सहन करून देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला बळकटी दिली. त्यामुळे अशा स्वातंत्र्यवीराचा अपमान करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल. बाळासाहेबांची शिवसेना असे प्रकार सहन करणार नाही, असा सज्जड दम मुख्यमंत्र्यांनी यावेळी भरला. शिंदे म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सहवास आम्हाला लाभला नाही, पण बाळासाहेबांचा लाभला. दोघांच्या हिंदुत्त्वात साम्य होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार बाळासाहेबांनी प्रत्यक्ष आचरणात आणण्याचे काम केले, असेही त्यांनी सांगितले.

मणिशंकर अय्यर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला, तेव्हा बाळासाहेबांनी जोडे मारो आंदोलन केले होते. आज पुन्हा तसे आंदोलन करण्याची वेळ आली आहे. कारण तसे प्रकार पुन्हा घडू लागले आहेत. बाळासाहेबांचा वारसा सांगणारे कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होत आहेत. बाळासाहेबांचे विचार तोडो आणि काँग्रेस जोडो अशी ही यात्रा आहे. त्यांना वाटते अशी यात्रा काढून मोदींना आव्हान देऊ, पण मोदी कुठे आणि हे कुठे, याचा विचार त्यांनी करावा, असेही शिंदे म्हणाले.

सावरकरांच्या गौरवाचा प्रस्ताव का फेटाळला?

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गौरवाचा प्रस्ताव आला होता. पण तो प्रस्ताव नियमात बसत नाही म्हणून अध्यक्षांनी फेटाळून लावला. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी विरोध का केला नाही? आम्हीसुद्धा तेव्हा मंत्रिमंडळात होतो. पण पर्याय नव्हता. त्यामुळेच आता उठाव करावा लागला. वेडेच इतिहास घडवतात. आम्ही कोणत्याही नफ्या-तोट्याचा विचार करून उठाव केलेला नाही. बाळासाहेबांचा विचार टिकवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. आता खऱ्या अर्थाने भाजपा- शिवसेना युतीचे हिंदुत्ववादी सरकार आले आहे. त्यामुळे यापुढे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, असेही शिंदे यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.