‘आम्ही जी आश्वासने देतो, ती जाहीरपणे देतो आणि पूर्णही करतो. बंद दाराआड आम्ही काहीच करीत नाही’, असा अस्सल ठाकरे शैलीतील टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या ‘हिंदुस्थान पोस्ट’ या डिजिटल माध्यमाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी, ५ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी ‘हिंदुस्थान पोस्ट’चे संपादक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सहकार्यवाह स्वप्नील सावरकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची मुलाखत घेतली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि ‘हिंदुस्थान पोस्ट’चे मुद्रक-प्रकाशक रणजित सावरकर, सावरकर स्मारकाच्या कोषाध्यक्ष आणि ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या सल्लागार संपादिका मंजिरी मराठे, शिवसेना खासदार राहुल शेवाळे, भाजपा नेते अवधूत वाघ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अमित शहा यांचा मुंबई दौरा, भाजपाने दिलेला मिशन १३५ चा नारा, विरोधकांकडून सातत्याने होणारी टीका यासंदर्भात त्यांनी विस्तृत भाष्य केले. उद्धव ठाकरे यांच्याशी मुख्यमंत्री पदाबाबत बंद दाराआड कोणतीही चर्चा झाली नव्हती, असा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केला. एकनाथ शिंदे यांनी याचाच धागा पकडून ‘आम्ही जी आश्वासने देतो, ती जाहीरपणे देतो आणि पूर्णही करतो. बंद दाराआड आम्ही काहीच करीत नाही. जे करायचे आहे तेच आम्ही बोलतो. जे पूर्ण होणार नाही, ते कधी बोलत नाही’, असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी लगावला.
(हेही वाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन)
लोकांच्या भेटीगाठी हेच टॉनिक
दिवसरात्र काम करणाऱ्या एकनाथ शिंदे यांना मध्यंतरी डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला होता. मात्र, आजही त्यांचे दौरे, भेटीगाठी यांचे प्रमाण कमी झालेले नाही. याविषयी विचारले असता शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री झाल्यापासून नव्हे, तर समाजकारणात प्रवेश केल्यापासून मी अहोरात्र काम करीत आहे. त्यामुळे थकवा किंवा ताण याचा फारसा विचार करीत नाही. लोकांना भेटल्यानंतर सगळा थकवा निघून जातो. दीघे साहेब असताना त्यांच्याबरोबर रात्रंदिवस फिरायचो. गणपती दर्शनाचे म्हणाल तर, अगदी गेल्यावर्षीपर्यंत ठरलेल्या मंडळांना भेटी देत होतो. आता मुख्यमंत्री झालो, म्हणून ते टाळता येणार नाही. कारण लोक वाट पाहत असतात. लोकांच्या भेटीगाठी हेच माझे टॉनिक आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.
अमित शहांची केवळ सदिच्छा भेट
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सोमवारी सकाळी जवळपास २० मिनिटे अमित शहा यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर गणपतीच्या दर्शनासाठीही दोघे सोबत होते. या भेटीदरम्यान काही राजकीय चर्चा झाली का, असे विचारले असता शिंदे म्हणाले, अमित शहा दरवर्षी मुंबईत गणपतीच्या दर्शनासाठी येत असतात. वर्षा निवासस्थानीही ते गणेश दर्शनासाठी ते आले होते. ही केवळ सदिच्छा भेट होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
(हेही वाचा उद्धव ठाकरेंनी धोका दिला, त्यांना जमीन दाखवा; अमित शहांनी दिला कार्यकर्त्यांना कार्यक्रम)
लालफितीत अडकू नका…
प्रशासनाला लोकाभिमूख करण्यासाठी आम्ही सुरुवातीलाच बैठक घेतली. त्यात मी आणि देवेंद्र फडणवीस होतो. अधिकाऱ्यांना सांगितले, हे लोकांचे सरकार आहे. लालफितीत अडकू नका. सरकारी काम, सहा महिने थांब, असा कारभार चालणार नाही. आपल्याला प्रशासन गतीमान करायचे आहे. हे फिल्डवर उतरणारे सरकार आहे, हे अधिकाऱ्यांनाही माहिती आहे. त्यामुळे ते अॅक्शन मोडमध्ये काम करीत आहेत, असे शिंदे यांनी सांगितले.