‘तुमचे नेते स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार अवमान करीत आहेत. पण, सावरकरांचा अवमान करणे हे देशद्रोहाचे काम आहे’, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचा समाचार घेतला.
( हेही वाचा : गेल्या १० महिन्यांत देशभरात ५ लाख किलोहून अधिक अंमली पदार्थ जप्त! )
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींना भाजपा-शिवसेनेच्या आमदारांनी गुरुवारी जोडे मारले. त्यावर विधिमंडळाच्या परिसरात अशी कृती योग्य नाही, असा आक्षेप घेत काँग्रेस-राष्ट्रवादीने शुक्रवारी विधानसभा सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्यामुळे सभागृहाचे कामकाज २० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यात हस्तक्षेप करीत काँग्रेस-राष्ट्रवादीचा कठोर शब्दांत समाचार घेतला. शिंदे म्हणाले, नाना पटोले तुम्हाला एकाच सांगतो, जेव्हा आपण दुसऱ्याकडे बोट दाखवतो, तेव्हा आपल्याकडे तीन बोटं असतात. त्यामुळे सभागृहाचे पावित्र्य प्रत्येकाने जपले पाहिजे. सावरकरांचा वारंवार अपमान करणे हे देशद्रोहाचे काम आहे.
आम्ही बोलत नाही याचा अर्थ आम्ही बोलू शकत नाही, असा घेऊ नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे नाव जगभरात पोहोचवले. त्यांच्याविषयी तुम्ही अवमानकारक बोलता. राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम ज्यांच्या नसानसात भिनले आहे, त्यांच्याविषयी तुमचा नेता असे वक्तव्य करतो. आमच्या लोकांचे फोटो, पोस्टर झळकावत नको नको ते बोलले गेले. गद्दार, खोके घेतले म्हणून हिणवले गेले, ते तुम्हाला चालले का? कारवाई व्हायची असेल, तर याचाही विचार करायला हवा. त्या सर्वांवरही कारवाई झाली पाहिजे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community