शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात, जुने निष्ठावंत शिवसैनिक होणार अधोरेखित

128

शिवसेनेचा दसरा मेळावा बुधवारी होत असून दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (शिवाजीपार्क) आणि वांद्रे कुर्ला संकुलात (बीकेसी) हे दोन्ही शिवसेना गटांचे मेळावे होणार आहे. या मेळाव्यांमध्ये पक्षप्रमुख उध्दव ठाकरे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी किती शिवसैनिक हजेरी लावतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र, या मेळाव्यामध्ये दोन्ही गटांकडून एकमेकांचे कपडे फाडण्याचा प्रकार होणार असला तरी निष्ठावंत शिवसैनिकांकडे कशाप्रकारे उध्दव ठाकरे यांनी पाठ फिरवली याची काही वानगी दाखल उदाहरणेही पुराव्यांसहित मांडून कशाप्रकारे शिवसेनेत शिवसैनिकांना बाजूला केले जाते याचाही पर्दाफाश केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

( हेही वाचा : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा; नाना पटोले यांची घोषणा)

शिवसेनेचे दोन गट झाल्यानंतर पहिला दसरा मेळावा होत असून शिंदे यांनी मूळ शिवसेनेवर दावा केल्याने परंपरागत बाळासाहेबांचा दसरा मेळावा आपलाच असल्याचेही त्यांनी सांगत या मेळाव्याची जोरदार तयार केली आहे. दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख असलेल्या उध्दव ठाकरे यांनी आपला परंपरागत शिवाजीपार्क येथील दसरा मेळाव्याचेही आयोजन केले असून एकाच दिवशी आणि एकाच वेळी शिवसेनेच्या दोन्ही गटांचे दसरा मेळावे पार पडणार आहेत.

शिवसेनेतून बाहेर पडलेल्या नंतर शिंदे गटात सामील झालेल्या शिवसेनेच्या नेत्यांसह शिवसैनिकांनी उध्दव ठाकरे हे भेटत नसल्याचा आरोप केला. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि शिवसेना नेते व युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी शाखाशाखांसह गणेश मंडळ आणि नवरात्रौत्सवात अनेक मंडळांना भेटी देण्याच सपाटा लावला. तसेच मागील वर्धापन दिनाच्या कार्यक्रमांत उध्दव ठाकरे यांनी काही जुन्या निष्ठावंत शिवसैनिकांचा उल्लेख करत काहींना आपण भेट असल्याचे सांगितले. मात्र, शिवसेनेत आजही असे काही शिवसैनिक आहेत, त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी अनेक खटले अंगावर तसेच प्रसंगी भाजपलाही अंगावर घेतले. परंतु असेच काही निष्ठावंत नेते आणि माजी लोकप्रतिनिधी यांना साधे भेटून त्यांची चौकशीही केली जात नाही. काही दिवसांपूर्वी मृत्यू पावलेल्या शिवसेना नेते सुधीर जोशी आणि त्यापूर्वी निधन पावलेले माजी नगरसेवक अजित पंडित हे अनेक वर्षे रुग्ण शय्येवर होते, परंतु त्यांची कधीही पक्षप्रमुखांनी भेट घेत विचारपूस केलेली नव्हती. तसेच माहिममधील शिवसेनेची रणरागिणी असलेल्या इंदूमती मांडगावकर यांचा मृत्यूही वृध्दाश्रमात झाला, परंतु पक्षाने कधीही त्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे आजही असे काही निष्ठावंत शिवसैनिक आहेत, जे मोडेन पण वाकणार नाही या बाण्यानेच आजही शिवसेनेसोबत जोडलेले आहे. परंतु पक्षप्रमुख आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांना त्यांची किंमत नाही. पक्षातील नेते त्यांच्या जिवावर मोठे झाले, परंतु आजही त्यांच्याकडे पहायला त्यांना वेळ नाही. अशा काही जुन्या निष्ठावंत शिवसैनिकांची यादीच शिवसेना शिंदे गटाने तयार केलेली असून यासर्वांची आठवण या दसरा मेळाव्या काढून यासर्वांकडे उध्दव ठाकरे कसे दुर्लक्ष केले याची पुराव्यांसहित उदाहरणे दिली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी कर्करोगाशी झुंज देणाऱ्या आमदार यामिनी जाधव यांच्या प्रकृतीची विचारपूस मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी सैफी रुग्णालयात जावून केली. त्यापूर्वी शिवसेना नेते लिलाधर डाके, खासदार गजानन किर्तीकर, रामदास कदत आदी निष्ठावंत नेत्यांसह शिवसैनिकांच्या भेटी घेऊन शिवसैनिक आहेत म्हणून हा पक्ष, संघटना आहे,असाच संदेश देण्याचे काम शिंदे यांनी केला होता.

हिंदुत्वाच्या मुददयावरून शिंदे गट बाजुला होत भाजपशी केलेल्या युतीनंतर उध्दव ठाकरे हे हिंदुत्वाच्या मुद्दयापासून कसे कसे लांब पळू लागले आणि कुणासाठी याचाही पर्दाफाश आता शिंदे गटाकडून लाव रे तो व्हिडीओच्या माध्यमातून केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.