छत्रपती संभाजीनगरमधील राड्यामागचे कारण मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले

207

छत्रपती संभाजीनगरमध्ये बुधवारी मध्यरात्री दोन गटात तुफान राडा झाला. किराडपुऱ्यातील राम मंदिरात तयारी करत असलेल्या तरुणांच्या एका गटाचा दुसऱ्या गटाशी वाद झाला. काही क्षणात या वादाचे रुपांतर हाणामारी, जाळपोळ आणि दगडफेकीत झाले. हा तुफान राडा पांगवण्यासाठी पोलिसांना यावेळी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या, शिवाय हवेत गोळीबार देखील करावा लागला. सध्या परिस्थिती नियंत्रणात आली आहे. दरम्यान या राड्यामागचे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगत सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.

प्रसार माध्यमांसोबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘या घटनेबाबत पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत बोललो आहे. आता सर्व काही नियंत्रणात आहे. पोलीस आपले काम करतायत. या घटनेची सगळी माहिती मी घेतली आहे. तिथले जे राम मंदिर आहे, त्या राम मंदिरावरून थोडासा वादविवाद झाला. परंतु आता सध्या तिथला संपूर्ण परिसर पोलिसांच्या नियंत्रणात आहे.’

पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, ‘सर्वांनी आता शांतता राखली पाहिजे. रामनवमीचा उत्सव आहे. आणि आपल्या राज्यामध्ये सर्वधर्मिय लोकं सर्व सण एकत्र येऊन साजारे करतात. त्यामुळे माझे सर्वधर्मियांना विनंती आणि आवाहन आहे की, रमजानचा महिना आहे, रामनवमी आहे, असे अनेक सण एकत्र येत असतात. आणि आपण ते इतके वर्ष गुण्यागोविंदाने साजरे करत असतो. त्यामुळे सर्वांनीच शांततेने या सर्व उत्सवांना सहकार्य केले पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली यासाठी सगळ्यांनीच सहकार्य करा.’

(हेही वाचा – छत्रपती संभाजीनगरमधील राड्यावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.