शिंदे गटातील आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांच्या कारवर सोमवारी पुण्यातील कात्रज परिसरात हल्ला करण्यात आला. त्यांच्या गाडीवर करण्यात आलेली दगडफेक आणि झालेला हल्ला हा शिवसैनिकांनी केल्याचे शिंदे गटाचं मत आहे. या हल्ल्यात सामंतांच्या गाडीच्या काचा फुटल्या. या हल्ल्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही निषेध केला आहे. या हल्ल्यानंतर उदय सामंत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
(हेही वाचा – संभाजीराजे छत्रपतींकडून परिवर्तनाच्या क्रांतीची घोषणा! म्हणाले, भेटूया…)
काय म्हणाले उदय सामंत
आपल्या सगळ्यांचा आशीर्वादाने मी सुखरूप आहे. मला कोणतीही ईजा झाली नाही. सुभाष देसाईंचा आणि हल्ले करणाऱ्यांच्या अकलेची मला कीव करावीशी वाटते. लोकशाहीमध्ये एखादा विचार बदलणं चांगल्या गोष्टींसाठी उठाव करणं याचा परिणाम अशा हल्ल्यात होत असेल तर महाराष्ट्राचं हे दुर्देव आहे, असे सामंत म्हणाले. यावेळी बोलताना सामंतांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीतला एक संदर्भ देत ते म्हणाले, मला उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीतला एक शब्दप्रयोग आवडला. तो म्हणजे राजकार हे आरोग्यदायी असले पाहिजे. पण दुसऱ्यावर हल्ला करणं, त्यांचं आरोग्य हिरावून घेणं हे कसलं राजकारण… हल्ला करणं म्हणजे उत्सुफर्त प्रतिक्रिया असे म्हणणाऱ्यांची कीव येते, असे म्हणत सामंतांनी सुभाष देसाईंनाही टोला लगावला आहे.
याबाबत बोलताना सामंत म्हणाले, राजकारण किती खालच्या स्तरावर जाते हे कालचे उदाहरण आहे. हा उत्स्फुर्त प्रतिसाद आहे असे सुभाष देसाई आणि निलम गोऱ्हे म्हणतात हे शिवसैनिक नाहीत. हे संभ्रमाचं वातावरण जाणीवपूर्वक निर्माण करण्यासारखे आहे. विचार पटला नाही म्हणजे ठार मारणं हा लोकशाहीचा स्तंभ नाही. परंतु काल सोज्वळ चेहऱ्यापलीकडचे प्रकार काय चालतात ते पाहिले आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.
पुढे ते असेही म्हणाले की, राजकारणाची लढाई ही विचारांची असते. त्यामुळे विकासाबाबत विचार करावा, झालेला हल्ला तो ज्यांनी केला त्यांची कीव येते. त्यामुळे टीकेचे उत्तर हे विकास कामे करून द्या, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. मी घडलेल्या प्रकाराबद्दल जास्त बोलत नाही याचा अर्थ मी हतबल आहे असा होत नाही, तर माझ्यावर चांगले संस्कार आहेत. मी काहीच करू शकत नाही, असा जर कोणाचा गोड गैरसमज असेल तर ते चुकीचे आहे. मी सामान्य कार्यकर्ता असतो आणि माझ्या नेत्यांनी असे केले असते तर मी स्वतः त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले असते, असे उदय सामंत म्हणाले.
Join Our WhatsApp Community