एकीकडे राज्याच्या राजकारणात फेरबदलांचे संकेत मिळत असताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीच्या सुट्टीवर गेल्याने चर्चांना उधाण आले आहे. २४ ते २६ एप्रिलपर्यंत तीन दिवस ते रजेवर असून, सातारा येथील दरे या मूळ गावी थांबणार आहेत.
( हेही वाचा : योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने साताऱ्याला रवाना
एखादा मुख्यमंत्री अचानक रजेवर जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबतची बैठक संपवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने साताऱ्याला रवाना झाले.
ते रजेवर जाण्याची अनेक कारणे चर्चेत आहेत. यातील पहिले कारण म्हणजे, शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालय लवकरच निकाल देणार आहे. त्यावर शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे निकाल आपल्याच बाजूने लागावा, यासाठी ते देवाला साकडं घालण्यासाठी गावाला गेल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे, राज्यातील सरकार कायम राहावे यासाठी भाजपा प्लॅन ‘बी’ आखत आहे त्यामध्ये अजित पवारांना सोबत घेऊन सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. भाजपाने अजित पवारांना सोबत घेण्याची बाब कदाचित शिंदे यांना पटली नसावी, त्यामुळे ते काही दिवस सुट्टीवर गेल्याचेही बोलले जात आहे.
( हेही वाचा : केशवानंद भारती खटल्याचा निकाल वेबपेजवर! सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय)
डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला?
एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, सततचे दौरे, उशिरापर्यंत चालणारे काम, भेटीगाठी, यामुळे शिंदे यांना काहीसा थकवा जाणवत आहे. त्यामुळे काही दिवस सर्व कामकाज बाजूला ठेवून विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळेच ते मुंबईपासून लांब साताऱ्याला गेल्याचे सांगण्यात आले.
हेही पहा :
Join Our WhatsApp Community