राज्यात १८ नव्या संवर्धन राखीव क्षेत्रांची भर

98

राज्यात १८ नवीन आणि ७ प्रस्तावित संवर्धन राखीव क्षेत्र घोषित करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी मान्यता दिली. त्यामुळे राज्यात संवर्धन राखीव क्षेत्रांची संख्या ५२ होणार आहे. त्यामाध्यमातून सुमारे १३ हजार चौरस किलोमीटर क्षेत्र संरक्षित होण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी राज्य वन्यजीव मंडळाची १९ वी बैठक झाली.

(हेही वाचा – लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय ‘या’ दिवसापासून होणार सुरू)

यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. वाय एल पी राव, वन्यजीव मंडळाचे सदस्य सचिव तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये आदी उपस्थित होते. संवर्धन राखीव क्षेत्रातील वन्यजीवांचे संवर्धन करताना त्या भागातील ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनात अडचण येणार नाही, त्यांचे हक्क बाधीत होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

या क्षेत्रांचा समावेश

पुणे आणि रायगड जिल्ह्यातील वेल्हे-मुळशी (८७.४१ चौरस कि.मी.), लोणावळा (१२१.२० चौरस कि.मी.), पुणे-ठाणे जिल्ह्यातील नानेघाट ( ९८.७८ चौरस कि.मी.), पुणे जिल्हा भोरगिरीगड ( ३७.६४ चौरस कि.मी.), नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी (६२.१० चौरस कि.मी.), सुरगाणा ( ८६.२८चौरस कि.मी.), ताहाराबाद (१२२.४५ चौरस कि.मी.), नंदूरबार जिल्ह्यातील कारेघाट (९७.४५ चौरस कि.मी.), चिंचपाडा (९३.९१ चौरस कि.मी.), रायगड जिल्ह्यातील घेरा मानिकगड (५३.२५ चौरस कि.मी.) व अलिबाग (६०.०३ चौरस कि.मी.), ठाणे पुणे जिल्ह्यातील राजमाची (८३.१५ चौरस कि.मी.), ठाणे जिल्ह्यातील गुमतारा (१२५.५० चौरस कि.मी.), पालघर जिल्ह्यातील जव्हार (११८.२८ चौरस कि.मी.), धामणी (४९.१५ चौरस कि.मी.), अशेरीगड (८०.९५ चौरस कि.मी.), सांगली जिल्ह्यातील आटपाडी (९.४८ चौरस कि.मी.), चंद्रपूर जिल्ह्यातील एकारा (१०२.९९ चौरस कि.मी.) यांचा समावेश आहे.

राखीव क्षेत्राची गरज काय?

राष्ट्रीय उद्यानालगत आणि अभयारण्यालगत किंवा दोन संरक्षित क्षेत्र जोडणाऱ्या भूप्रदेशातील प्राणी, वनस्पती यांच्या अधिवासाचे संरक्षण करण्याच्या हेतूने संवर्धन राखीव क्षेत्र घोषीत केले जातात. प्रस्तावित संवर्धन राखीव क्षेत्रांमध्ये नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गड, ठाणे जिल्ह्यातील मोरोशीचा भैरवगड, औरंगाबाद जिल्ह्यातील धारेश्वर, त्रिकुटेश्वर, कन्नड, पेडकागड तर नांदेड जिल्ह्यातील किनवट चा समावेश आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.