मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून केलेल्या उठावामुळे पक्षात उभी फूट पडली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडून शिंदे गटातील आमदार, खासदारांना गद्दार म्हणून संबोधले जात आहे. त्यावरुन आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. खरी गद्दारी कोणी केली, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.
गद्दारी कोणी केली?
ज्या भाजपसोबत आपण युतीत राहून लढलो, जनतेने आपल्याला कौल दिला. पण असे असताना सुद्धा भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याऐवजी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन करुन तुम्ही मुख्यमंत्रीपद मिळवलं. मग गद्दारी आणि विश्वासघात कोणी केला?, असा थेट सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे.
बाळासाहेबांचा विश्वासघात नाही का?
ज्या बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेस, राष्ट्रवादीला थारा दिला नाही त्या काँग्रेस, राष्ट्रवादीला तुम्ही मुख्यमंत्रीपदासाठी जवळ केलंत मग हा बाळासाहेबांचा विश्वासघात नाही का?, ज्या बाळासाहेबांनी हिंदुत्वाशी तडजोड केली नाही त्यांच्या विचारांचा विश्वासघात कोणी केला? स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणा-या काँग्रेसविरोधात आम्हाला बोलता येत नव्हतं, ज्या मुंबईत दाऊदने बॉम्बस्फोट घडवले त्याच्याशी संबंध असलेल्या मंत्र्याला पाठीशी घालण्याची वेळ आमच्यावर आली, मग सत्तेसाठी केलेला हा विश्वासघात नाही का, असे सवाल एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
(हेही वाचाः ‘ज्या दिवशी मी बोलेन तेव्हा भूकंप होईल’, मुलाखतीवरुन मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना इशारा)
अजूनही अनेक गोष्टी माझ्यात आणि त्यांच्यामध्ये आहेत त्या मी आज तुम्हाला सांगणार नाही. पण जसं समोरुन बोलणं होईल तसं मग मलाही तोंड उघडावं लागेल, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
Join Our WhatsApp Community