विधवा महिलांचा उल्लेख गंगा भागीरथी म्हणजेच गं.भा असा केला जावा असा नवीन प्रस्ताव राज्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मांडला आहे. पण प्रस्तावाला विरोध केला जात आहे. कोणी याला हास्यास्पद म्हणत आहेत तर कोणी याला अपमानास्पद म्हणत आहेत. याच वादावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की, ‘महिलांचा सन्मान करणार आमचे राज्य आहे. म्हणून यंदाच्या अर्थसंकल्पात लेक लाडकी, जन्मापासून ते वयाच्या अठरा वर्षापर्यंत एक लाखापर्यंत अनुदान देण्याचा प्रयत्न केलाय. महिलांना एसटीमध्ये ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला. हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणारे सरकार आहे. त्यामुळे महिलांचा सन्मानच आम्ही राज्यात करतो.’
लोढा यांचा काय आदेश?
समाजातील उपेक्षित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनातर्फे अनेक उपक्रम राबवले जातात. त्यातून समाजातील उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्याबरोबरच आणि त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अपंग’ऐवजी ‘दिव्यांग’ असा शब्दप्रयोग रुढ केला. त्यामुळे दिव्यांग बांधवांना समाजामध्ये मानाचे स्थान मिळवून देण्यात येऊन त्यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलत आहे. याच धर्तीवर राज्यातील विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी ‘विधवा’ऐवजी ‘गंगा भागिरथी’ हा शब्द वापरण्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करा, असा आदेश लोढा यांनी विभागाच्या प्रधान सचिवांना दिला.
(हेही वाचा – विधवा महिलांचा ‘गंगा भागीरथी’ उल्लेख; वाद पेटल्यावर काय म्हणाले मंत्री मंगलप्रभात लोढा?)
Join Our WhatsApp Community