ठाकरेंनी हटवले, शिंदेंनी पुन्हा बसवले! ठाणे जिल्हाप्रमुखपदी म्हस्केंची पुनर्नियुक्ती

119

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील पदाधिका-यांच्या बाबतीत घेतलेले निर्णय बदलायचा धडाका सुरू केला आहे. उद्धव ठाकरेंनी जिल्हाप्रमुख पदावरुन हकालपट्टी केलेल्या संतोष बांगर यांची शिंदे यांनी पुन्हा पुनर्नियुक्ती केल्यानंतर आता शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांची देखील एकनाथ शिंदे यांनी जिल्हाप्रमुखपदी पुनर्नियुक्ती केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना शिंदे यांनी आणखी एक दणका दिला आहे.

म्हस्के यांची पुनर्नियुक्ती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर त्यांना समर्थन दर्शवत शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी आपल्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर म्हस्के यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याचे सामनातून जाहीर करण्यात आले. पण ही हकालपट्टी बेकायदेशीर ठरवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेश म्हस्के यांची पुन्हा एकदा ठाणे जिल्हाप्रमुखपदी पुनर्नियुक्ती केली आहे. गुरुवारी नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतल्यानंतर शिंदे यांनी म्हस्के यांच्याकडे जिल्हाप्रमुख पदाची सूत्रं सोपवली.

(हेही वाचाः नामांतराच्या मुद्द्यावरून राऊतांकडून अपप्रचार?)

सामनाला अधिकार नाहीत

बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्ववादी विचारांचा ध्वज हाती घेणा-या एका कडवट शिवसैनिकाला पदावरुन हटवण्याचे अधिकार सामनाला नाहीत, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खडे बोल सुनावले आहेत. त्यामुळे ठाणे जिल्हाप्रमुखपदी नरेश म्हस्के यांनी पुन्हा एकदा जोमाने काम करावे, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच आजवर मनमानी पद्धतीने हकालपट्टी करण्यात आलेल्या शिवसेनेच्या सर्व पदाधिका-यांची पुन्हा एकदा त्याच पदांवर पुनर्नियुक्ती करण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.