मागील काळात बंद सम्राट मुख्यमंत्री पदावर बसले होते, ते युती सरकारचे सर्व प्रकल्प बंद करत सुटले होते. त्यांनी मेट्रो प्रकल्प रखडवला, रिफायनरीला विरोध केला. आजही त्यांची भाषा तीच आहे. क्लस्टर बंद करू, धारावी प्रकल्प बंद करू म्हणत आहेत, अशा बंद सम्राटांना कायमचे बंद करा, अशी टीका उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता करत क्रांतीची मशाल म्हणतात, घराघराला आग लावणारी जातीजातीत आग लावणारी ही मशाल आहे, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केला.
छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील महायुतीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे या शिवतीर्थावरून विचारांचे सोने वाटायचे होते, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विचारांचे सोने वाटायला आले आहेत, म्हणून आता २३ नोव्हेंबर रोजी आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे. पंतप्रधान मोदी काही दिवसांपूर्वी मुंबईत अनेक विकासकामांचे उदघाटन करून गेले, तो तर ट्रेलर होता. देशाची अर्थव्यवस्था जी ५ ट्रिलियन डॉलरचे करण्याचे ध्येय आहे, त्यातील एक तृतीयांश भाग मुंबईचा असेल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केला.
मविआ म्हणजे महाराष्ट्र विरोधी, महाविकास विरोधी आघाडी आहे. २००४ ते २०१४ यात काँग्रेसने महाराष्ट्राला २ लाख कोटी दिले, परंतु मोदींनी पुढील १० वर्षांत १० लाख कोटी दिले, म्हणून विरोधकांच्या पोटात दुखत आहेत. आज महाराष्ट्राची परिस्थिती बदलली आहे. अनेक योजनांमुळे गेम चेंज झाले आहेत, आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेने महाविकास आघाडीचा गेम चेंज केला आहे. आमच्या या योजनेला विरोधक विरोध करत होते, तीच योजना आता ते चोरायला लागले आहेत. मविआने राज्याला १० वर्षे मागे टाकले. पण महायुतीने या राज्याला प्रगतीच्या पथावर आणले, यामागे पंतप्रधान मोदी नावाची महाशक्ती आहे. आज ज्या मोदींवर तुम्ही आरोप करत आहात, त्या मोदींवर १० वर्षांत एकही भ्रष्टाचाराचा आरोप करता आला नाही. पूर्वी प्रधानमंत्री कधी कुठल्या देशात गेले तर कळायचे नाही, पण आता मोदी ज्या देशात जातात तिथे भारताचे नाव रोशन होत आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले.
Join Our WhatsApp Community