CM Eknath Shinde : घरात बसणाऱ्यांना लोक निवडणुकीत साफ करतील; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

मिलिंद देवरा यांच्या मनात ज्या भावना आहेत, त्याच भावना  दीड वर्षांपूर्वी आपल्याही मनात होत्या. कुठलाही निर्णय घेताना त्याचे बरे-वाईट परिणाम होतात, पण धाडस करावे लागते, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

176

राज्यात आपण डीप क्लीन ड्राइव्ह सुरु केले आहे. यामुळे मुंबईचे प्रदूषण कमी झाले आहे. मी स्वतः रस्त्यावर उतरतो. हातात झाडू घेतो. पाण्याचा पाईप घेतो. तेव्हा आयुक्त, आमदार, खासदारही हातात झाडू घेतात. काही लोक कल्याणमध्ये जाऊन म्हणाले, ‘आता ते रस्ते साफ करत आहेत त्यांना साफ करा.’ रस्त्यावर असणाऱ्यांना लोक कसे साफ करणार? घरात बसणाऱ्यांना लोक साफ करतात. निवडणुकीत घरात बसणाऱ्यांना जनता साफ करील, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टोला हाणला.

जेवढे आरोप कराल तेवढे खड्ड्यात जाल 

माजी खासदार मिलिंद देवरा यांनी रविवार, १४ जानेवारी रोजी काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी देत शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. डीप क्लीन ड्राइव्हमुळे जनतेचा प्रचंड सहभाग वाढला आहे. निवडणुकीत लोक त्यांची साफसफाई करणारच आहे, पण आता गरज आहे मुंबईच्या स्वच्छतेची. मुंबईत पुढच्या दोन-अडीच वर्षांत मुंबई खड्डे मुक्त करणार आहे. मुंबई देशातच नव्हे तर जगात नंबर एकच करायची आहे. आपल्याला जी२० चे अध्यक्षपद आले तेव्हा मुंबई सजवली. त्यावेळी २२ देशांचे प्रतिनिधी आले होते. मुंबई कधी थकत नाही, बंद पडत नाही, इथे कुणी उपाशी झोपत नाही. मी मुख्यमंत्री झाल्यापासून दीड वर्षात एकही सुटी घेतली नाही, गावी गेलो तरी तिथेही जनता दरबार घेतो. तिथे गेल्यावर माझे पाय आपोआप शेतीकडे वळतात. मी हेलीकॉप्टरवरून गावाला जातो आणि शेती करतो. हेलीकॉप्टरवरून फोटोग्राफी करत नाही. जेवढे आमच्यावर आरोप करतील तेवढे ते खड्ड्यात जातील, असेही मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले.

(हेही वाचा Milind Deora : मिलिंद देवरा यांच्या पक्ष प्रवेशावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, अद्याप माहित नाही, पण…)

पंतप्रधान महाराष्ट्रात येतात तेव्हा अनेकजण अस्वस्थ होतात 

काही लोक म्हणायचे गरिबी हटाव, पण गरीब हटला, परंतु गरिबी हटलीच नाही. पंतप्रधान मोदी यांनी पुढील ३ वर्षे दारिद्य रेषेखालील जनतेला मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदी राज्यात येतात, प्रकल्पांचे उदघाटन करतात, त्यासाठी निधी देतात, पण जेव्हा पंतप्रधान महाराष्ट्रात येतात तेव्हा अनेक जण अस्वस्थ होतात, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कशी बदलेल याचा विचार जेव्हा होतो तेव्हा मिलिंद देवरा यांच्यासारखे दूरदृष्टी असणारे नेते पक्षात आल्यावर त्याचा लाभ होतो. ऑफिसमध्ये बसून तुम्ही राज्याला पुढे घेऊन जाऊ शकत नाही तुम्हाला रस्त्यावर उतरावेच लागेल, असेही मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले.

मिलिंद देवरा सुसंकृत, संयमी आणि उच्च शिक्षित व्यक्तिमत्व

मिलिंद देवरा यांच्या मनात ज्या भावना आहेत, त्याच भावना  दीड वर्षांपूर्वी आपल्याही मनात होत्या. कुठलाही निर्णय घेताना त्याचे बरे-वाईट परिणाम होतात, पण धाडस करावे लागते. मी जेव्हा निर्णय घेतला तेव्हा श्रीकांतच्या आईला विश्वासात घेतले होते, कारण आपण कोणताही विचार आपल्या माणसाला बोलून दाखवत असतो. दीड वर्षांपूर्वी मी ऑपरेशन केले, त्यावेळी सुईही टोचली नाही आणि टाकाही लागला नाही, असेही सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेतील उठावाचे वर्णन केले. देवरा कुटुंबाचे ५५ वर्षे काँग्रेस पक्षाशी नाळ जोडली होती. मुरली देवरा यांचे मुंबईसाठी योगदान आहे. तुम्हीही दोन वेळा खासदार होतात. एखादा ग्रामपंचायतीचा सदस्यही निर्णय घेताना १० वेळा विचार करतो. काही लोक असे असतात ते पुन्हा होत नाही, ते दुर्मिळ असतात. ते स्वतःसाठी जगत नाही. दुसऱ्यासाठी, जगासाठी जगत असतात. मला काय मिळाले, त्यापेक्षा मी देशाला काय देणार, असा विचार करणारे बाळासाहेब ठाकरे आणि मुरली देवराही होते. तुम्ही उच्च शिक्षित आहात. आता काळ बदलला आहे. उच्च शिक्षित आणि दूरदृष्टी, व्हिजन असलेल्या लोकांची आज गरज आहे. त्यानुसार एक सुसंकृत, संयमी आणि उच्च शिक्षित व्यक्तिमत्व आमच्या पक्षात येत आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.