विकासकामांमुळे अनेकांना पोटदुखी, मळमळ अन् धडकी भरली; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर निशाणा

106

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबईमध्ये मेट्रोसह अनेक विकासकामांचे गुरुवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकासकामांचा पाढा वाचत विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला. मुंबईतील ४०० किलोमीटर रस्त्यांच्या सिमेंट-काँक्रीटच्या निविदेत कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप शिवसेना युवाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला होता. यालाच प्रत्युत्तर मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे. ‘डांबरीकरणाच्या नावाखाली काळं-पांढरं करण्याची लोकांची दुकान बंद होतील याचे दुखः विरोधकांना झाले आहे. सरकारने सहा महिन्यात घेतलेले निर्णय पाहून अनेकांची पोटदुखी, मळमळ सुरू झाली आहे. तसेच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, छातीत धडकी भरली आहे,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींच्या समोर म्हणाले. पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘मविआ सरकारच्या काळात किती विकास झाला हे सर्वांना माहित आहे. अगदी ठप्प झालेल्या कामांना खऱ्या अर्थाने चालना देण्यासाठी आणि जो काही लोकोपयोगी योजनाचा खऱ्या अर्थाने श्वास गुदमरला होता त्यातून या राज्याची, जनतेची मुंबईकरांची सुटका करण्याची आम्हाला संधी मिळाली. ही संधी फक्त मोदींसाहेबांसारख्या धाडसी नेतृत्वामुळे मिळाली.

दोन-अडीच वर्षांमध्ये मुंबईचा कायापालट

‘जेव्हा मी पंतप्रधान मोदींना पाहतो, भेटतो, तेव्हा माझ्या मनात पवित्र भावना निर्माण होते. त्यांच्या व्यक्तित्वात काही खास आहे, जे आपल्याला विश्वास आणि ऊर्जा देते. मुंबईकरांचे जगणे सुसहय्य करण्याची सुरुवात खऱ्या अर्थाने आज झालेली आहे. येत्या दोन-अडीच वर्षांमध्ये या मुंबईचा कायापालट झाल्याचे आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने आजच्या दिवसाची सुरुवात ही सुवर्ण अक्षरात नोंद करावी अशी ठरली आहे. ऑक्टोबर २०१५मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याच मेट्रोचे भूमिपूजन केले होते. त्यावेळेस मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस होते आणि आज मोदींच्याच हातातून या सेवांचे लोकार्पण होत आहे, हा मोठा दैवी योग आहे’, असे मुख्यमंत्री म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे आणि मोदींचे जिव्हाळ्याचे नाते

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान मोदींचे जिव्हाळ्याचे नाते होते हे सांगण्याची गरज नाही. हिंदुत्व आणि हिंदुत्वचा अभिमान हा दोघांच्याही विचारांशी जोडणारा समान धागा होता. आणि विकासाचे राजकारण हा पाया होता. तेच सुत्र धरून अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यासाठी पंतप्रधान मोदींना आम्ही आमंत्रित केले, असे मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले. (हेही वाचा – २५ वर्षे मुंबई महापालिकेवर सत्ता गाजवणाऱ्यांनी स्वतःची घरे भरली; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.