आम्हाला गद्दार म्हटले जात आहे, भास्कर जाधव आम्ही गद्दार नाही. जो काही निर्णय घेतला आहे, यात वैयक्तिक काही स्वार्थ नव्हता. सुरुवातीला मला मुख्यमंत्री करणार ही वस्तुस्थितीत होती. पण अजितदादा की कुणी तरी सांगितले, एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री नको म्हणून सांगितले. त्यानंतर मला सांगितले तुम्हीच मुख्यमंत्री होणार आहे. सुधीर जोशी आणि मनोहर जोशी यांचा किस्सा सुरू होता, त्यावेळी मी अजितदादांना विचारला, त्यावेळी त्यांनी पक्षातूनच विरोध होता असे सांगितले गेले. त्यानंतर मी हे सगळे विसरलो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
५० आमदारांनी माझ्यावर विश्वास टाकला
माझ्याबरोबर आलेल्या ५० आमदारांमध्ये महाविकास आघाडी सरकारमधील ८ मंत्री होते, ४० आमदार आणि अपक्ष होते, एकीकडे बलाढ्य सरकार होते, सरकारमधील मोठमोठी माणसे होती, यंत्रणा होती. आणि दुसरीकडे एक कार्यकर्ता, शिवसैनिक, दिघे साहेबांचा सैनिक होता. ज्याच्यावर या ५० जणांनी विश्वास टाकला. जेव्हा आम्ही आमचे मिशन सुरु केले तेव्हा एकानेही विचारले नाही की, ‘का चाललो आहे, कुठे चाललो आहे, किती दिवस जाणार आहे.’ ज्या दिवशी आम्ही निघालो त्या दिवशी मी डिस्टर्ब् होतो. विधान परिषदेच्या निवडणुकीत दुसऱ्या दिवशी जेव्हा मतदान होते, त्यादिवशी मला जी वागणूक मिळाली, माझ्याशी जसे वर्तवणूक करण्यात आली. त्याचे साक्षीदार इकडे बसलेले आणि समोर बसलेले आमदार आहेत, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
(हेही वाचा आता लिखापडी बंद, थेट कार्यवाही! मुख्यमंत्री म्हणाले सिस्टीम बदलणार )
माझे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरु होता
बाळासाहेबांनी सांगितले होते, न्याय मिळवण्यासाठी बंड असेल, उठाव असेल, तर सगळे करायचे आणि त्यानंतर मला काय झाले माहित नाही. माझे धडाधड फोन सुरु झाले, प्रतिसाद मिळत चालला. मुख्यमंत्रीही फोन करत होते, कुठे चाललात, कधी येणार, असे विचारले. मी म्हणालो माहित नाही. तेव्हा एकाही आमदाराने म्हटले नाही की, ‘जाण्याआधी मुख्यमंत्र्यांना भेटून जाऊ’, हा माझ्यावरील विश्वास होता. हा एका दिवसाचा कार्यक्रम नाही. सुनील प्रभूला माहित आहे माझे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न कसा सुरु होता. म्हणून मी ठरवले आता माघार जायचे नाही. शिवसेना वाचवण्यासाठी लढून हौतात्म पत्करले तरी चालेल, असा निश्चय केला, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
एकनाथच्या घरावर दगड मारणारा अजून पैदा झाला नाही
माझ्या आमदारांना मी सांगितले की, ज्या दिवशी मला वाटेल की, तुम्ही परत निवडून येऊ शकत नाही, त्या दिवशी मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगेन आणि जगाचा निरोप घेईन. ही छोटी घटना नाही. एक ग्रामपंचायतीचा सदस्यही इकडून तिकडे जायला तयार नसतो. हे का झाले, याचा विचार केला पाहिजे होता. एकीकडे माझ्याशी बोलायला माणसे पाठवायची आणि दुसरीकडे पुतळे जाळायची, घरांवर माणसे पाठवायची, एकनाथ शिंदेच्या घरावर दगडफेक करण्याचा आदेश द्यायचा. एकनाथ शिंदेंच्या घरावर दगड मारणारा अजून पैदा झाला नाही. जितेंद्र आव्हाडांना माहित आहे माझ्यावर प्रेम करणारी माणसे किती आहेत. मधमाशांच्या मोहळाप्रमाणे चवताळून डसून माझ्यावर उगारणारे हात उखडून टाकतील. ३०-३५ वर्षे एकनाथ शिंदेने जीवाचे रान केले आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
(हेही वाचा सत्तेत असताना शिवसैनिकाला तडीपाऱ्या, वाँटेड शिवाय काही मिळाले नाही! मुख्यमंत्र्यांनी मांडली व्यथा)