गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात सत्तांतर झाले आणि त्याचं मुख्य केंद्रस्थान राहिले ते म्हणजे आसाममधील गुवाहाटी. दरम्यान, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार आणि खासदार कुटुंबासह आज, शनिवारी एकनाथ शिंदे यांच्या सोबत गुवाहाटीला जात आहेत. दरम्यान, गुवाहाटीतील प्रसिद्ध असणाऱ्या कामाख्या देवीच्या दर्शनासाठी हे सगळे जात असताना मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आणि गुवाहाटीला का जात आहोत, याचे कारणही स्पष्टच सांगितले.
काय म्हणाले एकनाथ शिंदे
कामाख्या देवीच्या दर्शनासाठी आम्ही जात आहोत. सर्व समर्थक खासदार, आमदार आणि मंत्री म्हणाले होते की, पुन्हा एकदा देवीच्या दर्शनाला जाऊ, या सर्वांनी असे बोलल्यानंतर हा दौरा नियोजित केला आहे. तर आम्ही हे राज्यासाठी करत असून राज्याच्या सुखसमृद्धी आणि भरभराटीचं देवीला साकडं देखील घालणार आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
राज्यातील बळीराजाला चांगले दिवस येऊ देत. राज्यातील जनता सुरू होऊ देत. राज्यावर आलेली संकट अनिष्ठ दूर होऊ देत. यासाठी आमचा प्रयत्न असतो. जनतेच्या जीवनात अमूलाग्र बदल होऊ दे ही प्रार्थना करणार आहे. ही प्रामाणिक भावना आहे. हाच आमचा अजेंडा आहे. बाकी काही दुसरा आमचा अजेंडा नाही. राज्यातील अतिवृष्टी, संकट टळू देत राज्याच्या जनतेला सुखी ठेव यासाठी आम्ही कामाख्या देवीकडे प्रार्थना करणार आहोत, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले.
(हेही वाचा – दौंड, कलबुर्गी येथे MSRTC बसला फासलं काळं, महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांची बस सेवा तात्पुरती बंद; काय आहे कारण?)
पुढे मुख्यमंत्री शिंदे असेही म्हणाले की, आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला निमंत्रण दिले होते. आम्ही गुवाहाटीवरून घाई गडबडीत आलो होतो. त्यामुळे आता आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या आमंत्रणावरूनच आम्ही गुवाहाटीला जात आहोत. श्रद्धेने जात आहे. त्यामध्ये कोणाला काही वाटण्याची आवश्यकता आहे, असे वाटत नाही. महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील सरकार स्थापन झाले. त्यामुळे देवीकडे आणखी काही मागण्याची गरज नाही, कामाख्या देवीने आमची इच्छा पूर्ण केली असल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांचीही शिंदे सदिच्छा भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे.