वीर सावरकर होण्याची तुमची लायकी नाही; राहुल गांधींवर मुख्यमंत्री शिंदेंची टीका

103

काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करत आहेत. याच मुद्द्यावरून राहुल गांधींचा निषेध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींच्या सावरकरांवरील वक्तव्याचा मुख्यमंत्री शिंदेंनी चांगलाच समाचार घेतला. वीर सावरकर होण्याची तुमची लायकी नाही, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी राहुल यांच्यावर केली. सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहुल गांधींचा निषेध करताना म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करत आहेत. त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. पण मी राहुल गांधींचा जाहीर निषेध, धिक्कार करतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि हे आंदोलन करत असताना त्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. त्यामुळे खऱ्या अर्थाने या देशभक्तांच्या त्यागातून हे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे. त्या मिळालेल्या स्वातंत्र्याचा आपण उपभोग सर्वजण घेतोय आणि त्यामुळे या देशामध्ये लोकशाही आहे. या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने वावरण्याचा, निर्णय घेण्याचा अधिकार देखील मिळाला. परंतु खऱ्या अर्थाने ज्या देशभक्ताने आणि स्वातंत्र्यसैनिकांनी जो त्याग केला, बलिदान दिलं आणि हे स्वातंत्र्य मिळवलं. त्यांचा जाणीवपूर्वक वारंवार अवमान, अपमान करण्याचा जो निंदनीय प्रकार केला जातो, त्याचा निषेध संपूर्ण राज्यातच नाही, तर देशभरात होतोय. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या सेल्युलर जेलमध्ये मरण यातना झेलल्या तिथे राहुल गांधी यांनी एक दिवस राहून यावं, मग त्यांना त्याची जाणीव होईल. पण त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार आपण? म्हणून त्यांच्या कृत्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे.

वीर सावरकरांचा त्याग तुमच्यामध्ये नाही – मुख्यमंत्री 

पुढे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, खऱ्या अर्थाने राहुल गांधींचा निषेध हा सगळ्यांनी केला पाहिजे होता. ज्यांनी सावरकरांचा अवमान केला ते वारंवार सांगताहेत ‘मी वीर सावरकर नाही, गांधी आहे.’ पण वीर सावरकर होण्याची तुमची लायकी देखील नाहीय. वीर सावरकरांचा त्याग तुमच्यामध्ये नाहीये. तुम्ही काय वीर सावरकर होऊ शकता? वीर सावरकर होण्यासाठी तेवढा त्याग, या देशाबद्दलचं प्रेम हे तुमच्यामध्ये असायला पाहिजे. पण तुम्ही तर या देशाची निंदा परदेशात जाऊन करता. याच्यापेक्षा जास्तीच दुर्दैव काय असू शकतं या देशाचं? देशाच्या लोकशाहीबद्दल बोलताय, पंतप्रधान मोदींबाबत बोलताय. परदेशात जाऊन ज्याप्रमाणे देशाची निंदा करताय हा खऱ्या अर्थाने देशद्रोह आहे. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर हे फक्त महाराष्ट्राचे दैवत नसून संपूर्ण देशाचे दैवत आहेत.

(हेही वाचा – अपमान सहन होत नाही मग मांडीला मांडी लावून का बसलात?, बावनकुळेंचा ठाकरेंना सवाल)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.