लोकसेवा असो किंवा निवडणूक आयोग निकालाला महत्त्व असते; मुख्यमंत्र्यांचे सूचक वक्तव्य

117

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अनावधानाने चूक झाली होती. राज्य लोकसेवा आयोगाऐवजी निवडणूक आयोग असा त्यांनी उल्लेख केला होता. त्यानंतर विरोधकांनी त्यांची खिल्ली उडवत टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी कसब्यात हेमंत रासनेंच्या प्रचारार्थ रोड शोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तर दिले. लोकसेवा असो किंवा निवडणूक आयोग निकालाला महत्त्व असते, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

पुण्यात कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कसब्याचा पूर्व भाग ढवळून निघाला आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरले असून कसब्यामध्ये त्यांनी भव्य रोड शो केला. यावेळी मतदारांशी त्यांनी संवाद साधला.

‘जेव्हा शेतकरी पाणी मागतो, त्यावेळेस काय दाखवतात? धरण. जाऊ दे ते मी बोलत नाही, अशा लोकांकडून काय अपेक्षा करणार?’ असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना टोला लगावला. तसेच ‘अजित पवार गुरुवारी प्रचारादरम्यान म्हणाले होते की, मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभा घ्यायची, रोड शो करायची काय गरज असते? पण हा एकनाथ शिंदे माणसांमधला कार्यकर्ता आहे. आज किती लोक रस्त्याने उभी होते. काही मुले सही घेतात, हार घालतायत, विषय घेऊन येतायत. एमपीएससीचे विद्यार्थी भेटले. त्यामुळे हा भेटणारा माणूस आहे. हा तोंड लपवून पळवून जाणारा नाही. एमपीएससीचे विद्यार्थी इथे आहेत. आम्हाला लोकसेवा आयोगाच्या निर्णयाचे श्रेय घ्यायचे नाही. पण विद्यार्थ्यांची भूमिका तिच आमची भूमिका हे आम्ही लोकसेवा आयोगाला सांगितले. एकनाथ शिंदे जे बोलतो ते करून घेतो. गुरुवारी माझ्या तोंडून चुकून राज्य लोकसेवा आयोगाऐवजी निवडणूक आयोग असा उल्लेख झाला. लोकसेवा आयोग काय किंवा निवडणूक आयोग काय? निकालाला महत्त्व आहे. आणि निकाल देण्याचे काम देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवले,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.

(हेही वाचा – उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला, तेव्हाच आम्ही कायदेशीर लढाई जिंकली; शिवसेना आमदाराचे सूचक विधान)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.