राज्यात झालेल्या सत्तांतराला एक महिना उलटून गेला तरी अजूनही त्याचे पडसाद उमटत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. आमदारांपाठोपाठ खासदार, नगरसेवक,शाखाप्रमुख यांनी देखील शिंदे गटाला आपले समर्थन दिले आहे. त्यातच आता राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालात देखील शिंदे गट आणि भाजप युतीला चांगले यश मिळाले आहे.
या यशाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवार आणि कार्यकर्त्यांचे ट्वीट करत अभिनंदन केले आहे. यावेळी शिवसेना-भाजप युतीचा विजय झाला असल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा उल्लेख मात्र उद्धव ठाकरे गट असा केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा नवीन वाद छेडला जाणार असल्याची शक्यता आहे.
‘उद्धव ठाकरे गट’ असा उल्लेख
राज्यातील 271 ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालात भाजपला सर्वाधिक 82 ठिकाणी विजय मिळाला आहे. तर मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला 40 ठिकाणी यश आले आहे. या निकालाबाबत ट्वीट करताना एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाचा उल्लेख पुन्हा एकदा शिवसेना असा केला आहे. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा उल्लेख मात्र उद्धव ठाकरे गट असा केला आहे. त्यांच्या या ट्वीटची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
मुख्यमंत्र्यांचे ट्वीट
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना – भाजपा युती सरकारला जनतेचा कौल मिळाला आहे. शिवसेना-भाजपा युतीच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन तसेच निवडणुकीत मेहनत घेतलेल्या सर्व शिवसेना-भाजपा युतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे तसेच मतदार राजाचे अभिनंदन आणि आभार…, असे ट्वीट करत मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना – भाजपा युती सरकारला जनतेचा कौल…
शिवसेना – भाजपा युतीच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन तसेच निवडणुकीत मेहनत घेतलेल्या सर्व शिवसेना – भाजपा युतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे तसेच मतदार राजाचे अभिनंदन आणि आभार… pic.twitter.com/2Y72CAFuSy
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 6, 2022