राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर नरिमन पॉइंट येथील ट्रायडन्ट हॉटेलमध्ये शिंदे गटाची बैठक पार पडली. यात शिवसेनेचे १२ खासदार ऑनलाइन माध्यमातून सहभागी झाल्याच्या चर्चा दिवसभर सुरू होत्या. एकनाथ शिंदे यांच्या अचानक ठरलेल्या दिल्ली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या चर्चांना एकप्रकारे पुष्टी मिळाली असून, आमदारांच्या पाठोपाठ शिवसेनेचे खासदारही राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत आहेत का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
( हेही वाचा : राष्ट्रपती निवडणुकीत २८३ सदस्यांनी बजावला मतदानाचा हक्क )
दिल्ली दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त
ट्रायडन्ट हॉटेलमधील बैठकीत नवी कार्यकारिणी जाहीर करण्यासह भावना गवळी यांची प्रतोद पदी, तर राहुल शेवाळे यांची गटनेते पदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे पत्र मंगळवारी लोकसभा अध्यक्षांना दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सोमवारी रात्री ९ वाजता शिंदे मुंबई विमानतळावरून दिल्लीला रवाना होतील. रात्री ११.२५ वाजता ते महाराष्ट्र सदनात पोहोचतील. मंगळवारी १९ जुलैला रात्री ९ वाजता नवी दिल्ली येथून ते मुंबईकडे प्रयाण करतील. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात १६ आमदारांच्या अपात्रतेविषयी होणारी सुनावणी, मंत्रिमंडळ विस्तार आणि लोकसभेत खासदारांचा गट स्थापन करण्यासंदर्भात शिंदे दिल्लीला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community