मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी नाशिक येथील मालेगाव येथे आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला. ज्यावेळी माझी मुलाखत होईल तेव्हा राज्यात आणि देशात भूकंप झाल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
जेव्हा माझी मुलाखत होईल तेव्हा…
आज मी जाहीरपणे काही गोष्टी बोलणार नाही. पण योग्य वेळ आली की नक्कीच बोलेन. आता काही लोकांनी मुलाखतींचा सपाटा सुरू केला आहे. ज्या दिवशी माझी मुलाखत होईल त्यावेळी केवळ राज्यात नाही तर देशात मोठा भूकंप झाल्याशिवाय राहणार नाही, असे विधान करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना थेट इशारा दिला आहे.
जनेतेने आम्हाला स्वीकारलं
आम्ही बंडखोरी किंवा गद्दारी केली नाही तर आम्ही राज्यात क्रांती घडवली. याची दखल जगातल्या 33 देशांनी घेतली. एवढा मोठा उठाव का होतो त्याच्या मूळाशी जाणं गरजेचं होतं. पण तसं न होता गद्दारीचा शिक्का आमच्या माथी मारण्याचा प्रयत्न होत आहे. पण जनेतेने आमचा स्वीकार केला आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
आमचा मुख्यमंत्री असूनही काही करू शकलो नाही
ज्या बाळासाहेबांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आपले शत्रू मानले त्यांच्याशी कधीही मी मैत्री करणार नाही, हे बाळासाहेबांचे शब्द आहेत. बाळासाहेबांचे हेच विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत. ज्या भाजपसोबत आपण युतीमध्ये लढलो त्यांच्यासोबत आम्ही जात आहोत. महाविकास आघाडीच्या काळात अनेक शिवसैनिकांवर खोटे खटले भरण्यात आले पण आमच्याच पक्षाचा मुख्यमंत्री असताना आम्ही काहीही करू शकलो नाही. त्यामुळे हे आम्हाला अजिबात मान्य नव्हतं म्हणूनच आम्ही ही भूमिका घेतली असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
Join Our WhatsApp Community