विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजप आणि शिंदे गटाच्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला होता. यावेळी सभागृहात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावूक झाले. आपल्या दोन मुलांच्या मृत्यूत्या आठवणीने मुख्यमंत्री शिंदे यांचे मन गहिवरून आले आणि ते भावूक झाले.
(हेही वाचा – Maharashtra Assembly session: अजित पवारांनी घेतली फडणवीसांची खुर्ची!)
…आणि शिंदेंना अश्रू झाले अनावर
सभागृहाला संबोधित करताना शिंदे म्हणाले की, माझ्या वडिलांनी मला खूप कष्ट करून इथेपर्यंत आणलं. मी घरी जायचो तेव्हा आई-वडील झोपलेले असायचे, मी उठण्यापूर्वी ते कामाला निघून जायचे. तसंच माझा मुलगा श्रीकांत याच्याबाबत घडलं. मी कधीच घराला वेळ दिला नाही तर मी माझा पूर्ण वेळ संघटनेसाठी दिला. मी शिवसैनिक म्हणून जगलो. माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. माझी दोन मुलं गेली. माझं कुटुंब उद्धवस्त झाले होते. मी ठरवलं होतं आता फक्त कुटुंबाला वेळ द्यायचा पण दिघे साहेब माझ्याकडे बऱ्याचदा आले. त्यांनी मला एकदा ठाण्यातील टेंभीनाक्यावर बोलावलं आणि सांगितले की आता तुला तुझे अश्रू पुसायचे आहेतच, सोबतच जनतेचे अश्रू पुसायचे आहेत. दिघेसाहेब माझ्यासाठी दैवत होते, असे म्हणत त्यांनी संघर्षमय आठवणींना उजाळा दिला.
शिंदे पुढे म्हणाले, शिवसैनिक म्हणून २५ वर्षे एकनाथ शिंदेने रक्ताचं पाणी केले. १७ वर्षांचा होतो तेव्हा बाळासाहेबांच्या विचाराने मी वेडा झालो आणि शिवसैनिक झालो. एका प्रकणात मी आनंद दिघेंच्या संपर्कात आलो. वयाच्या १८ व्या वर्षी शाखाप्रमुख झालो.
शिंदे-भाजप सरकारचा विजय
शिंदे-भाजप आघाडीने १६४ मतं मिळवत दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे आता शिंदे-भाजप सरकारला अधिकृतरित्या मान्यता मिळाली आहे. रविवारी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर विजयी झाल्यामुळे शिंदे-भाजप सरकार बहुमत चाचणीत देखील यशस्वी होईल, हे जवळजवळ स्पष्ट झाले होते. त्याप्रमाणे सोमवारी झालेल्या बहुमताच्या चाचणीत देखील शिंदे-भाजप सरकारने विजय संपादन केला आहे.
Join Our WhatsApp Community